
Temba Bavuma Record : टेंबा बावुमाने रचला इतिहास ! कर्णधार म्हणून पहिल्या 16 कसोटीत सर्वाधिक विजयांचा विक्रम
Temba Bavuma Record : मागील काही महिन्यांपासून टेस्ट फॉरमेटमध्ये दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन केले आहे. या यशा मागे त्यांचा कर्णधार टेंबा बावुमा याचा फार मोठा हात असून आता याच बावुमाने एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
एका कर्णधाराच्या रुपात सुरुवातीच्या 16 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार होण्याचा मान टेंबा बावुमाने पटकावला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मिळवलेल्या दणदणीत विजयासह बावुमाने हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
बावुमाने कर्णधार म्हणून पहिल्या 16 कसोटी सामन्यांपैकी 14 सामन्यांत विजय मिळवला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार लिंडसे हॅसेट हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 16 कसोटी सामन्यांपैकी 13 सामन्यात विजय प्राप्त केला होता.
या यादीत ऑस्ट्रेलियाच्या अनेक कर्णधारांची नावे आहेत. यात ऑस्ट्रेलियाचे बिल वुडफुल, स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉन्टिंग यांनी प्रत्येकी 16 पैकी 11 विजय मिळवले आहेत. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानेही पहिल्या 16 कसोटी सामन्यांत 11 विजय मिळवले होते. त्यामुळे या यादीत हे चारही कर्णधार संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.
या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला. पहिल्या डावात बांगलादेशने 400 धावा उभारल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी डावातील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. तौहीद हृदोयने 137, तर लिटन दासने 120 धावांची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 206 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
सलामीवीर तंजिद हसननेही 67 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर डेन पॅटरसनने 4 फलंदाजांना माघारी धाडले.
बांगलादेशच्या 400 धावांना प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 557 धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे त्यांना 157 धावांची आघाडी मिळाली. मार्केस एकरमनने 157 धावांची शानदार खेळी केली. झुबेर हमजाने 83 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 202 धावांची भागीदारी केली.
याशिवाय रायन रिकेल्टनने 102 धावा केल्या, तर कगिसो रबाडाने 72 धावांचे योगदान दिले. कर्णधार टेंबा बावुमा 68 धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशकडून हसन महमूदने 4 विकेट्स घेतल्या.
157 धावांच्या पिछाडीवर असलेल्या बांगलादेशला दुसऱ्या डावात मोठी खेळी करता आली नाही. संपूर्ण संघ अवघ्या 168 धावांवर गारद झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी केवळ 12 धावांचे लक्ष्य होते.
दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य अवघ्या 1.3 षटकांत एक विकेट गमावून पूर्ण केले. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेने नऊ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टेंबा बावुमाने कर्णधार म्हणून पहिल्या 16 कसोटी सामन्यांतील सर्वाधिक विजयांचा विक्रम आपल्या नावावर केला.
Ans: कर्णधार म्हणून पहिल्या 16 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक 14 विजय मिळवण्याचा विक्रम टेंबा बावुमाने केला.
Ans: टेंबा बावुमाने पहिल्या 16 कसोटी सामन्यांपैकी 14 सामन्यांत विजय मिळवला.
Ans: ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार लिंडसे हॅसेट 13 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.