अनेक वर्ष टेनिस (Tennis) या खेळावर अधिराज्य गाजवून आपली वेगळी छाप सोडणारी दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams ) हिने मंगळवारी टेनिसमधून निवृत्तीत (Retire) होण्याची घोषणा केली आहे. तिच्या या घोषणेनंतर टेनिस रसिक सोशल मीडियावर काही प्रमाणात दुःख व्यक्त करीत असून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देत आहेत.
२३ ग्रँड स्लॅम विजेती अमेरिकन (American) खेळाडू सेरेना हिने निवृत्तीची घोषणा करताना म्हटले की, ती खेळापासून “दूर होत आहे”. ४० वर्षीय टेनिस सेरेना ने सांगितले, की ती काय करत आहे याचे वर्णन करण्यासाठी सर्वोत्तम शब्द म्हणजे “उत्क्रांती” हाच आहे. तसेच आपल्याला आता कुटुंब वाढवायचे आहे. “मला निवृत्ती हा शब्द कधीच आवडला नाही. तो मला आधुनिक शब्दासारखा वाटत नाही. मी निवृत्तीकडे संक्रमण म्हणून पाहते आहे असे तिने म्हंटले.
यंदाच्या वर्षी सुरुवातीलाच विम्बल्डन स्पर्धेत पहिल्याच फेरीत सेरेनाचे आव्हान संपुष्टात आले होते. मात्र तिने आता यूएस ओपनवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. अखेरच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केल्याचे सेरेनाने म्हटले आहे. अर्थातच ती युएस ओपननंतर निवृत्त होणार आहे. सेरेना पुढे म्हणाली की, “दुर्दैवाने मी यावर्षी विम्बल्डनसाठी तयार नव्हते. मला हेही माहित नाही की मी युएस ओपन जिंकण्यासाठी तयार आहे की नाही. पण मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.
सेरेनाने कारकिर्दीत एकेरीमध्ये २३ ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकली आहेत, जे खुल्या स्पर्धेतील एका खेळाडूने जिंकलेले सर्वाधिक आहेत. सेरेना महिला टेनिसच्या क्रमवारीत सलग ३१९ आठवडे अव्वल होती.
सेरेनाने पोस्ट केलेल्या फोटोत तिने लिहिले आहे की, “आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वेगळ्या दिशेने जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खूप प्रेम करता तेव्हा तो काळ नेहमीच कठीण असतो. माझ्या चांगुलपणाने मी टेनिसचा आनंद घेतो. मात्र, आता काऊंटडाऊन सुरु झालं आहे. मला एक आई म्हणून आता जगायचं आहे.” दरम्यान सेरेनाने आई म्हणून जगण्यावर अधिक लक्ष द्यायचं या पोस्टमध्ये लिहिलं असल्याने ती लवकरच खेळातून निवृत्त होईल असं दिसून येत आहे.