मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषकासाठी (ICC World Cup) भारतीय संघाची (Team India) घोषणा काल सोमवारी करण्यात आली आहे. भारतीय संघात यंदा अनेक अनुभवी तसेच नवख्या खेळाडूंना स्थान देण्यात आले असून भारतीय संघ या खेळाडूंसह विश्वचषकात कशी कामगिरी करतो हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. मात्र असे असताना अनेक स्टार क्रिकेटपटूंना विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे या स्टार खेळाडूंचे चाहते सोशल मीडियावर काही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
आयपीएल ऑक्शन २०२२ मध्ये इशान किशनला (Ishan Kishan) १५ कोटी रुपये मिळाले. परंतु आयपीएलमधील काही सामने सोडले तर त्याच्या सामन्यांमध्ये इशान किशनची बॅट शांत राहिली. आशिया चषक २०२२ मध्येही इशान किशनचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. टी २० विश्वचषक २०२२ च्या संघात निवड न होणे हा इशान किशनसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक (Dinesh Kartik)यांची टी २० विश्वचषक २०२२ साठी यष्टिरक्षक म्हणून निवड झाली आहे. त्याचवेळी संजू सॅमसनला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनची (Sanju Samsan) निवड न झाल्याने त्याचे चाहते संतापले आहेत. संतप्त चाहते सोशल मीडियावर सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आशिया कप २०२२ साठी देखील संजू सॅमसनची भारतीय संघात निवड झाली नव्हती, त्यानंतर बरेच प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु २०२२ च्या आशिया कपमध्ये सॅमसन ऐवजी संघात स्थान दिलेल्या ऋषभ पंतची कामगिरी देखील अपेक्षेप्रमाणे झाली नाही.
काही खेळाडूंचे पुनरागमन :
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि हर्षल पटेल यांचे विश्वचषकासाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. आशिया चषक २०२२ मध्ये आपल्या डेथ बॉलिंग कौशल्याने प्रभावित करणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील भारतीय संघात स्थान मिळवले. मोहम्मद शमी, दीपक चहर श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई या खेळाडूंना या संघात स्थान मिळालेले नसले तरी हे सर्व खेळाडू स्टँडबाय खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत.