IPL 2025: 'What Dhoni is for Jharkhand, Vaibhav Sooryavanshi is for Bihar.'; Local cricket legend predicts
IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या (28 एप्रिल) ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थानने गुजरात टायटन्सला पराभूत केले. गुजरातने २०९ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात राजस्थानने १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकी खेळीच्या जोरावर १६ व्या षटकात लक्ष्य पूर्ण केले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या १०१ धावांच्या खेळीने एक इतिहास रचला. त्याच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. आयपीएलच्या इतिहासात सोमवारचा दिवस बिहारसाठी एक ऐतिहासिक क्षण म्हणून पुढे आला. जेव्हा समस्तीपूरच्या १४ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध जलद शतक झळकावले. ही ऐतिहासिक खेळी पाहून बिहारचे स्थानिक क्रिकेटचे दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार आशुतोष अमन भावुक होत म्हटले की, एमएस धोनीने झारखंडसाठी जे केले आहे, तेच वैभव बिहारसाठी करण्याची क्षमता ठेवतो.
बिहारचे माजी कर्णधार आशुतोष अमन यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, वैभव सूर्यवंशीमुळे लोक आता बिहारला ओळखू लागले आहेत. जेव्हा मी त्याला षटकार मारताना पाहिले तेव्हा माझे डोळे भरून आले होते. त्याने बिहारला क्रिकेटच्या नकाशावर आणून ठेवले. आता लोकांना समस्तीपूर देखीलमाहिती होऊ लागले आहे.
वैभवने आयपीएलमधे पदार्पण केले त्याच पहिल्या सामन्यात शार्दुल ठाकूरला षटकार खेचून आपले खाते उघडले होते आणि रशीद खानला षटकार मारून आपले शतक पूर्ण केले आहे. वैभवच्या या शैलीबद्दल आशुतोष अमन पुढे म्हणाले की, बिहारच्या डीएनएमध्येच आहे की ते कोणाला भीत नाहीत. कारण आपल्याकडे गमावण्यासारखे काही नाही आणि मिळवण्यासारखे खूप काही आहे.
आशुतोष अमन यांनी एक आठवन सांगितली की, जेव्हा वैभवने वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी पदार्पण केले होते. तेव्हा ते म्हणाले की, त्यांना काळजी वाटत होती. त्यावेळी आशुतोष अमन बिहारचे नेतृत्व करत होते. ते म्हणाले की सुरुवातीला मला खूप काळजी वाटत होती की, या मुलाला दुखापत होईल. किंवा हा मोठ्या पातळीवरील दबाव हाताळू शकणार नाही. ते चार दिवस माझ्यासाठी खूपच चिंतेचे गेले. मला त्याची खूप काळजी वाटत होती.
जेव्हा वैभवने मुंबईविरुद्धच्या सामन्यात काही चांगले फटके देखील मारले तेव्हा मला दिलासा मिळाला. मग मी ड्रेसिंग रूममध्ये म्हणालो की बिहारला पहिला क्रिकेटचा सुपरस्टार मिळाला आहे. तथापि, त्या डावात वैभव फक्त १९ धावा करून बाद झाला होता. पण त्या धावसंख्येनंतरही, त्याला खात्री होती की हा मुलगा तितक्यावरच थंबणार नाही.
हेही वाचा : DC vs KKR : केकेआरच्या Sunil Narine ची मोठ्या विक्रमाला गवसणी, ‘या’ विश्वविक्रमाची केली बरोबरी..
वैभवने त्याच्या खेळीने सर्वांचे मन जिंकली आहेत. त्याच्या फलंदाजीचे सगळेच चाहते निर्माण झाले आहेत. वैभवमुळे बिहारला आता एक वेगळी ओळख मिळायला लागली आहे. वैभवने बिहार आणि बिहारच्या खेळाडूंना एक नवी आशा दाखवली आहे. क्रिकेट तज्ज्ञांचा देखील असा विश्वास आहे की हा तरुण स्टार येत्या काही काळात भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठे नाव कमावू शकतो. खर तर वैभवसाठी ही तर एक सुरुवात आहे, त्याला सातत्याने चांगली कामगिरी करावी लागणार आहे.