
वय वर्षे 20, तिसराच वनडे अन् पाच विकेट्स! वैष्णवी शर्माची ICC Ranking मध्ये मोठी भरारी
भारतीय महिला क्रिकेट संघाची युवा फिरकीपटू वैष्णवी शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत प्रभावी गोलंदाजी केल्यानंतर वैष्णवीने आयसीसीच्या (ICC Ranking) महिला वनडे गोलंदाजी क्रमवारीत तब्बल 53 स्थानांची झेप घेतली आहे. ती आता 94 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, कारकिर्दीतील अवघ्या तिसऱ्याच वनडे सामन्यात तिने 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
20 वर्षीय वैष्णवीने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर मालिकेतील अखेरच्या सामन्यातही तिने आपला प्रभाव कायम ठेवला. तिने 39 धावा देत 5 फलंदाजांना माघारी धाडले. तिच्या या कामगिरीमुळे भारताने सामना जिंकत मालिकेत 3-0 असे दणदणीत यश मिळवले. वैष्णवीला सामनावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
आयसीसी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी प्रगती केली आहे. सायली सातघरे हिने 18 स्थानांची झेप घेत 85 वे स्थान मिळवले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत तिने सहा षटकांत अवघ्या 11 धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. डावखुरी फिरकीपटू क्रांती गौड हिनेही एका स्थानाची प्रगती करत 24 वे स्थान गाठले आहे.
झिम्बाब्वेची नोमवेलो सिबांडा दोन स्थानांनी पुढे जात 60 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. गोलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची अलाना किंग अव्वल स्थानी आहे. भारतीय खेळाडूंमध्ये दीप्ती शर्मा आठव्या क्रमांकावर असून ती सर्वोत्तम स्थानावर आहे.
फलंदाजी क्रमवारीत भारतीय सलामीवीर प्रतिका रावल हिने तीन स्थानांची प्रगती करत 18 वे स्थान मिळवले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत तिने सलग तिसरे अर्धशतक झळकावले. शेफाली वर्मानेही अखेरच्या वनडेत 51 धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळे तिने आठ स्थानांची झेप घेत 65 वे स्थान मिळवले.
झिम्बाब्वेची मोडेस्टर मुपाचिकवा तीन स्थानांनी पुढे जात 36 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर कर्णधार जोसेफिन एनकोमोने दोन स्थानांची प्रगती करत 49 वे स्थान मिळवले आहे. फलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेची लॉरा वोल्वार्ड्ट अव्वल स्थानी कायम आहे. भारतीय कर्णधार स्मृती मानधना दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Ans: वैष्णवी शर्माने महिला वनडे गोलंदाजी क्रमवारीत 53 स्थानांची झेप घेत 94 वे स्थान मिळवले.
Ans: तिसऱ्या वनडेत तिने 39 धावा देत पाच विकेट्स घेतल्या. दुसऱ्या वनडेत तिने चार विकेट्स मिळवल्या होत्या.
Ans: दीप्ती शर्मा आठव्या क्रमांकावर असून भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वोच्च स्थानी आहे.