
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs Pakistan, T20 World Cup 2026 : २०२६ चा टी२० विश्वचषक सुरु व्हायला काही महिने शिल्लक राहिले आहेत. हा विश्वचषक भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे. आता या स्पर्धेआधी भारत आणि पाकिस्तान सामन्याची उत्सुकता वाढली आहे. हा सामना या स्पर्धमध्ये पाहायला मिळणार आहे. २०२६ च्या टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नसले तरी, भारत-पाकिस्तान सामन्याच्या तारखांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.
२०२५ च्या आशिया कपनंतर टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील. ESPNcricinfo नुसार, भारताला पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया यांच्या गटात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध होईल. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीत त्यांचा सामना नामिबियाशी होईल. स्पर्धेतील सर्वात मोठा सामना १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. भारताचा शेवटचा गट सामना १८ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध होईल.
२०२६ चा टी२० विश्वचषक ७ फेब्रुवारी रोजी सुरू होईल आणि ८ मार्च रोजी अंतिम सामना होईल. भारत आणि श्रीलंका हे दोघेही विश्वचषक आयोजित करत आहेत. पाकिस्तान त्यांचे सर्व सामने कोलंबो किंवा कॅंडी येथे खेळेल. स्पर्धेचे स्वरूप २०२४ च्या विश्वचषकासारखेच राहील, ज्यामध्ये २० संघ चार गटांमध्ये विभागले जातील. विश्वचषकामध्ये प्रत्येक गटामधील पहिले दोन संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करणार आहेत. त्यानंतर या संघांना दोन सुपर ८ गटांमध्ये विभागले जाईल, प्रत्येक गटात चार संघ असतील. या सुपर ८ गटांमधील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत आणि नंतर अंतिम फेरीत प्रवेश करतील.
India and Pakistan will play each other in the 2026 Men’s T20 World Cup on February 15 in Colombo, with the full schedule set to be announced by the ICC on Tuesday. India and Pakistan will be in a group with the USA, Netherlands and Namibia Full story: https://t.co/gS6UnPauqQ pic.twitter.com/04gAGoJxHV — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 24, 2025
यावेळी टी-२० विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होतील, ज्यामध्ये भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि यूएई या देशांचा समावेश आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की टीम इंडिया या स्पर्धेत गतविजेता म्हणून प्रवेश करेल. बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला होता.