IND vs PAK (Photo Credit- X)
IND vs PAK, Asia Cup 2025: दुबईमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. आशिया कपच्या या सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने पराभूत केले. पण, सामन्यानंतर आणि टॉसच्या वेळीही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्येही उपस्थित राहिला नाही. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, हा बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटचा निर्णय होता आणि काही गोष्टी खेळ भावनेपेक्षाही जास्त महत्त्वाच्या असतात.
हा वाद उफाळून आल्यानंतर आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, मैदानावर खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवणे आवश्यक आहे का? यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच आयसीसीचा (ICC) नियम काय सांगतो?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही एक परंपरा आहे की, सामना संपल्यावर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हात मिळवतात. हा एक मैत्रीपूर्ण सलोखा दर्शवणारा क्षण असतो. मात्र, आयसीसीच्या नियमावलीमध्ये खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवणे अनिवार्य आहे, असे कुठेही स्पष्टपणे लिहिलेले नाही.
आयसीसीच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’मध्ये मात्र इतर अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. यात असे म्हटले आहे की, ‘खेळाडूंनी विरोधी संघाच्या खेळाडूंचा आणि पंचांचा आदर केला पाहिजे.’ म्हणूनच, क्रिकेटमध्ये सामना संपल्यानंतर खेळाडू साधारणपणे एकमेकांशी हस्तांदोलन करतात किंवा बॅट/ग्लोव्हजने अभिवादन करतात.
खेळभावनेवर आधारित नियमांनुसार, क्रिकेट नेहमीच खेळाच्या भावनेने खेळला पाहिजे. ‘फेअर प्ले’म्हणजेच निष्पक्ष खेळ खेळण्याची जबाबदारी कर्णधारांवर असते, पण ती सर्व खेळाडू, पंच आणि प्रशिक्षकांचीही असते. यामध्ये प्रतिस्पर्धकांचा आदर करणे, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे खेळणे, पंचांचे निर्णय स्वीकारणे आणि एक सकारात्मक वातावरण तयार करणे या गोष्टींचा समावेश आहे.
पाकिस्तानची भूमिका: माजी पाकिस्तानी कर्णधार राशिद लतीफ यांनी भारतीय संघावर राजकारण करण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ” हस्तांदोलन न करणे हा एक ‘डाग’ आहे, जो त्यांना आयुष्यभर सोबत घेऊन फिरावा लागेल. याआधीही युद्धे झाली, पण आम्ही नेहमीच हस्तांदोलन केले आहे. पहलगाम हल्ल्याबद्दलच्या भावना योग्य आहेत, पण जेव्हा तुम्ही मैदानात असता तेव्हा खेळ योग्य मार्गाने खेळला पाहिजे.”
माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी म्हटले आहे की, “हा एक क्रिकेटचा सामना आहे, त्याला राजकारण करू नये. घरातील वाद विसरून पुढे गेले पाहिजे.”
भारताची भूमिका: भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “आम्ही फक्त येथे खेळायला आलो होतो आणि आम्ही त्यांना योग्य उत्तर दिले. काही गोष्टी खेळभावनेपेक्षाही जास्त महत्त्वाच्या असतात. हस्तांदोलन न करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटचा होता. आम्ही आमच्या सरकार आणि बीसीसीआयच्या सोबत आहोत.”