२०२३ मध्ये रंगणाऱ्या महिला टी २० विश्वचषकाचे वेळापत्रक (Womens T20 World Cup 2023) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे. या विश्वचषकात दहा महिला संघ सहभागी होणार असून यांमध्ये प्रत्येकी पाच संघांचे अ आणि ब असे दोन गट करण्यात आले आहेत. ही स्पर्धा १० फेब्रुवारीपासून ते २६ फेब्रुवारी पर्यंत रंगणार असून यात चाहत्यांना महिला क्रिकेटचा थरार अनुभवता येणार आहे.
यंदा महिला टी २० विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाला देण्यात आले असून यंदा दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. सहभागी होणाऱ्या ग्रुप अ मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, बांगलादेश, न्यूजीलंड आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. तर ग्रुप ब मध्ये भारत, पाकिस्तान, वेस्ट विंडीज, इंग्लंड आणि आयरलँड या संघांना ग्रुप ब मध्ये ठेवण्यात आलं आहे. तर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये साखळी फेरीत सामना रंगणार आहे. २६ फेब्रुवारी केपटाऊनमध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकामध्ये आयसीसीनं महिला टी २० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली असताना भारताची माजी कर्णधार आणि आयसीसीची राजदूत मिताली राज (Mitali Raj) ही तेथे उपस्थित होती. दरम्यान, ऑस्ट्रेलियात २०२० मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला होता. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने चमकदार कामगिरी केली होती.
भारताची माजी कर्णधार मिताली राज वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर म्हणाली, “वेळापत्रकाची घोषणा आपल्याला टी २० विश्वचषकाजवळ घेऊन जात आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये मोठ्या संख्येनं प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येतील, अशी मला आपेक्षा आहे. तसेच भारतीय संघाने देखील विश्वचषक खेळण्यासाठी तयारीला कसून सुरुवात केली आहे, असे मिताली राज म्हणाली.