
यशस्वी जैस्वालची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल (Photo Credit - X)
नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना संपल्यानंतर यशस्वीला पोटात असह्य वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याला तातडीने आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मिळालेल्या रिपोर्टनुसार, यशस्वीला ‘एक्यूट गॅस्ट्रोएन्टेरिटिस’ (Acute Gastroenteritis) झाल्याचे निदान झाले आहे. सामना सुरू असतानाही त्याला त्रास होत होता, मात्र सामन्यानंतर हा त्रास अधिक वाढला. रुग्णालयात त्याच्या काही महत्त्वाच्या चाचण्या, जसे की CT स्कॅन आणि अल्ट्रासाऊंड करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला नियमित औषधे घेण्याचा आणि पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
Yashasvi Jaiswal has been admitted to the hospital due to stomach swelling. Wishing him a speedy and complete recovery. Get well soon, champ 🤍 pic.twitter.com/BgFymmGPA6 — jaiswalhype (@jaiswalhype19) December 16, 2025
सामन्याचा थरार: अजिंक्य-सरफराजची फटकेबाजी
पुण्यात खेळल्या गेलेल्या या सुपर लीग ‘ग्रुप बी’ सामन्यात मुंबईने राजस्थानवर ३ गडी राखून मात केली. या विजयाचे मुख्य शिल्पकार ठरले ते म्हणजे कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सरफराज खान. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत रहाणेने नाबाद ७२ धावांची संयमी खेळी केली. (७ चौकार, ३ षटकार) सरफराजने मैदानात अक्षरशः वादळ आणले. त्याने अवघ्या २२ चेंडूत ७३ धावा कुटल्या. या वादळी खेळीत त्याने ७ षटकार आणि ६ चौकार लगावले. रहाणे आणि सरफराजने मिळून केवळ ३८ चेंडूत १११ धावांची तुफानी भागीदारी केली, ज्यामुळे सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले.
विजयी शेवट
सरफराज खान मानव सुथारच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव थोडा अडखळला. सुथारने ४ षटकांत २३ धावा देत ३ बळी घेतले. मात्र, रहाणेने एका बाजूने किल्ला लढवत ११ चेंडू राखून मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यात यशस्वी जायसवालला मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही, तो १६ चेंडूत केवळ १५ धावा करून बाद झाला.