भारताचा शेजारी देश पाकिस्तानसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने एक भयानक भविष्यवाणी केली आहे, ज्यामुळे तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. AI नुसार, पाकिस्तानला येत्या काळात दर १५ वर्षांनी भीषण पूर आणि भयंकर दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल. गेल्या काही वर्षांतील हवामानाचा विचार करता ही भविष्यवाणी सत्य वाटू लागली आहे.
पोहांग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर जोंगहुन काम आणि त्यांच्या टीमने AI च्या मदतीने पाकिस्तानच्या भविष्याबद्दल ही गंभीर चेतावणी दिली आहे. सतत वाढणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात असे मोठे बदल दिसून येतील, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये पूर आणि दुष्काळाची स्थिती वारंवार निर्माण होईल.
सिंधू नदीसारख्या नद्या पाकिस्तानच्या जीवनरेखा आहेत. येथील शेती, ऊर्जा आणि रोजच्या गरजा याच नद्यांवर अवलंबून आहेत. मात्र, हवामानातील बदलांमुळे परिस्थिती खूप गंभीर झाली आहे. विशेषतः पर्वतांच्या उंच भागात जिथे हिमनद्या वेगाने वितळत आहेत, ज्यामुळे नद्यांच्या प्रवाहांवर परिणाम होत आहे.
हे देखील वाचा: AI ला खासगी माहिती देताय? वेळीच व्हा सावध! हॅकर्स तुम्हाला बनवू शकतात शिकार
पारंपरिक हवामान मॉडेल्स डोंगर आणि दऱ्यांच्या भागात योग्यरित्या काम करू शकत नाहीत. ते कधी पाऊस कमी दाखवतात तर कधी जास्त, ज्यामुळे अचूक अंदाज लावणे कठीण होते. हे टाळण्यासाठी प्रोफेसर काम यांच्या टीमने AI मॉडेलला मागील वर्षांच्या वास्तविक डेटावर प्रशिक्षण दिले. यामुळे हवामानाचा अधिक अचूक अंदाज लावणे सोपे झाले.
या टीमच्या अहवालानुसार, वरच्या सिंधू नदीच्या खोऱ्याला दर १५ वर्षांनी भीषण पूर आणि दुष्काळाचा सामना करावा लागेल. तर, जवळपासच्या इतर नद्यांच्या खोऱ्यांमध्ये ही परिस्थिती दर ११ वर्षांनी उद्भवू शकते, असेही त्यांनी सांगितले. AI च्या या भविष्यवाणीमुळे पाकिस्तानच्या हवामान आणि कृषी क्षेत्रासाठी भविष्यातील आव्हाने स्पष्ट झाली आहेत.