फोटो सौजन्य - सोशल मिडीया
जगप्रसिध्द आणि लोकप्रिय टेक कंपनी Apple च्या डिव्हाईसमुळे लोकांचे प्राण वाचले, अशा अनेक घटना आतापर्यंत आपण पाहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. अमेरिकेत Apple च्या HomePod डिव्हाईसमुळे अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत. घरात आग लागलेली असताना Apple HomePod ने अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना इमर्जन्सी अलर्ट पाठवला. त्यामुळे अग्निशमन विभागाचे अधिकारी वेळेत घटनास्थळी दाखल झाले आणि मोठी दुर्घटना टळली.
अमेरिकेतील कोलोरॅडो येथील स्प्रिंग्स फायर डिपार्टमेंटमधील एका घरात पाळीव कुत्र्यामुळे स्वयंपाकघरात आग लागली होती. पहाटेच्या सुमारास ही आग लागली. त्यामुळे घरातील सर्वचजण गाढ झोपेत असल्याने कोणालाही या आगीची कल्पना आली नाही. या आगीबाबत Apple च्या HomePod डिव्हाईसने अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना इमर्जन्सी अलर्ट पाठवला. यानंतर अग्निशमन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पाळीव कुत्रा स्टोव्हजवळ ठेवलेल्या बॉक्समधून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत असताना आग लागली. स्टोव्ह अचानक सुरू झाला आणि स्वयंपाकघराला आग लागली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आग हळूहळू घरभर पसरत होती. त्यामुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं आणि मोठी दुर्घटना टळली. यानंतर घरातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. आग लागल्यानंतर आम्हाला Apple HomePod ने इमर्जन्सी अलर्ट पाठवला होता, त्यामुळे वेळेत सर्वांचे प्राण वाचू शकले आणि आगीवरही नियंत्रण मिळवले.
कंपनीने 2018 मध्ये HomePod Apple लाँच केलं होतं. यानंतर या HomePod Apple चे दुसरे वर्जन 2023 मध्ये लाँच करण्यात आलं. नवीन होमपॉडमध्ये आवाजाची गुणवत्ता सुधारली गेली आहे. तसेच यात S7 चिपसेट देण्यात आला आहे. यात अल्ट्रा व्हाईटबँडसाठी Apple U1 चिप देखील आहे. यासोबतच यात Wi-Fi 4 आणि Bluetooth 5 साठी सपोर्ट आहे.
Apple च्या डिव्हाईसमुळे लोकांचे प्राण वाचल्याची आणखी एक घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. अमेरिकेतील एका माणसाचे Apple Watch मुळे प्राण वाचले. घड्याळ एखाद्याचे प्राण कंस वाचवू शकतं, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. माईक यागर (७८) असं Apple Watch मुळे प्राण वाचलेल्या व्यक्तिचं नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, माईक यॅगर नेहमीच्या रस्त्याने चालत असताना ते अचानक खाली पडले, ज्यामुळे त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांच्या हातातील घड्याळाला ‘fall detection’ झाले. यानंतर सर्वात आधी घड्याळ्याने माईक यॅगर यांना अलर्ट दिला. मात्र त्यांचा काहीच प्रतिसाद न आल्याने घड्याळाने लगेच 911 या नंबरवर Emergency call लावला. यानंतर वैद्यकीय अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि माईक यॅगर यांचे प्राण वाचले.