
Scam Alert: 'मला कॉल करायला फोन मिळेल का..' अनोळखी व्यक्तीच्या जाळ्यात अडकलात तर क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! असे राहा सुरक्षित
या स्कॅमची सुरुवात अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने होते. जेव्हा एखादा अनोळखी व्यक्ती तुमच्याकडे तुमचा फोन मागतो आणि तुम्हाला सांगतो की मला एक कॉल करायचा आहे, तेव्हा तुम्ही अगदी सहज त्या व्यक्तीला तुमचा फोन देता. पण तुमच्या या निर्णयामुळे तुमचे बँक अकाऊंट रिकामी होऊ शकते. याबाबत तुम्हाला कल्पना आहे का? लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी स्कॅमर्सनी हा नवीन स्कॅम सुरू केला आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
एखादा अनोळखी व्यक्ती तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला सांगतो की माझा फोन बंद झाला आहे, माझ्या फोनची चार्जिंग संपली आहे किंवा माझ्या फोनमधील रिचार्ज संपला आहे आणि मला एक अत्यंत गरजेचा फोन करायचा आहे… अशावेळी तुम्ही अगदी सहज समोरच्या व्यक्तीला तुमचा फोन कॉल करण्यासाठी देता. इथेच सुरू होतो खरा खेळ. अनोळखी व्यक्ती तुमच्या फोनवरून त्याच्यासाठी साथीदाराला कॉल करतो. त्यानंतर समोरचा व्यक्ती तुमचा नंबर सगळ्यात आधी सेव्ह करतो. यानंतर अनोखी व्यक्तीचा साथीदार तुमच्या बँक अकाउंटमध्ये लॉगन करण्यासाठी विनंती पाठवतो. यावेळी तुमच्या फोनवर एक ओटीपी येतो. यावेळी स्कॅमर अत्यंत हुशारीने त्याच्या साथीदाराला ओटीपी सांगतो, ज्याबाबत तुम्हाला समजत देखील नाही. ओटीपी सांगितल्यानंतर अगदी काही क्षणातच तुमचे बँक अकाऊंट रिकामे होते. या संपूर्ण स्कॅममध्ये तुम्हाला भनक देखील लागत नाही, की तुमची फसवणूक केली जात आहे. या स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
कोणत्याही अनोळखी व्यक्तिला तुमचा स्मार्टफोन देऊ नका. कोणीही कामाबद्दल कितीही महत्त्वाचे निमित्त सांगितले तरी, त्याला तुमचा स्मार्टफोन देऊ नका. जर एखाद्याला फोन करायचा असेल तर तुम्ही त्यांना जवळच्या दुकानाचा, ऑफिसचा किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा फोन वापरण्यास सुचवू शकता. तसेच, तुमच्या फोनवर येणाऱ्या ओटीपीवर नेहमी लक्ष ठेवा आणि अनपेक्षित ओटीपी आल्यास सतर्क रहा. तसेच, तुमच्या बँक अॅप्समध्ये बायोमेट्रिक्स आणि 2FA सक्षम ठेवा.