भारत सरकारची मोठी कारवाई, गुगल प्ले स्टोअरवरून हटवले 100 हून अधिक परदेशी अॅप्स; जाणून घ्या कारण
भारत सरकारने स्मार्टफोन युजर्सची सुरक्षा लक्षात घेऊन एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने गुगल प्ले स्टोअरला 119 परदेशी अॅप्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. या अॅप्समुळे युजर्सची आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते अशी चिंता व्यक्त करत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
सरकारने गुगल प्ले स्टोअरला जे 119 अॅप्स हटवण्याचे आदेश दिले आहेत, त्यामध्ये बहुतेक व्हिडिओ आणि व्हॉइस चॅट अॅप्स आहेत आणि ते चीन आणि हाँगकाँगशी जोडलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी कायद्याच्या कलम 69अ अंतर्गत अॅप्स हटवण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. हे कलम सरकारला राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकणाऱ्या अशा कंटेंट किंवा प्लॅटफॉर्मना ब्लॉक करण्याचा अधिकार देते. त्यामुळे ब्लॉक करण्यात आलेल्या 119 अॅप्समुळे राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली जात होती. (फोटो सौजन्य – Pinterest)
सरकारने गुगल प्ले स्टोअरला जे अॅप्स ब्लॉक करण्याचे आदेश दिलेले आहेत, ते अॅप्स सिंगापूर, अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत जोडलेले आहेत. मनीकंट्रोलच्या मते, सरकारने दिलेल्या आदेशानंतर आतापर्यंत 119 पैकी फक्त 15 अॅप्स काढून टाकण्यात आले आहेत आणि उर्वरित अॅप्स अजूनही डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. यापैकी काही अॅप्सच्या डेव्हलपर्सनी म्हटले आहे की, त्यांना गुगलने याबद्दल माहिती दिली आहे आणि ते ही समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारसोबत काम करण्यास तयार आहेत. ब्लॉक केलेल्या अॅप्समध्ये चांगअॅप, हनीकॅम आणि चिलचॅट यांचा समावेश आहे.
अहवालानुसार, अनेक डेव्हलपर्सनी म्हटले आहे की त्यांना गुगलकडून सरकारने दिलेल्या आदेशााबद्दल माहिती मिळाली आहे, परंतु त्यांना या संदर्भात अधिक स्पष्टीकरण अपेक्षित आहे. डेव्हलपर्सने म्हटलं आहे की या ऑर्डरचा त्यांच्या व्यवसायावर तसेच युजर्सवर मोठा परिणाम होईल. त्यापैकी काहींनी म्हटले आहे की ते भारत सरकारसोबत काम करण्यास तयार आहेत. म्हणजेच अॅप्समध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर त्या दूर केल्या जाण्याची शक्यता आहे.
2020 मध्ये चीनसोबतचा तणाव वाढल्यानंतर, भारत सरकारने चिनी अॅप्सविरुद्ध कठोर कारवाई केली. सरकारने वेगवेगळ्या प्रसंगी आदेश जारी करून 100 हून अधिक चिनी अॅप्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि पबजी सारख्या अॅप्सचा समावेश होता. तथापि, यापैकी काही आता परत आले आहेत. रिलायन्स रिटेलने चीनी फास्ट-फॅशन ब्रँड ॲप Shein भारतात रिलाँच केलं आहे. Xender: File Share, Share Music, Taobao Mobile, TanTan- एशियन डेटिंग अॅप या अॅप्सचं आतापर्यंत भारतात पुनरागमन झालं आहे.