iPhone 16e vs iPhone 16: महागड्या iPhone 16 पेक्षा स्वस्त iPhone 16e किती वेगळा? तुमच्या कोणता ठरणार बेस्ट, जाणून घ्या
टेक जायंट कंपनी अॅपलने त्यांच्या आयफोन 16 सिरीजमधील स्वस्त iPhone 16e बुधवारी लाँच केला आहे. भारतात रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या या स्वस्त आयफोनचं लाँचिंग पूर्ण झालं. खरं तर हा या वर्षातील पहिला आयफोन आहे. कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांची आयफोन 16 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमधील सर्व आयफोन नेहमीप्रमाणे प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आले.
आता कंपनीने या लाईनअपचा विस्तार करत सिरीजमधील एक नवा आणि स्वस्त आयफोन लाँच केला आहे. नवा आयफोन लाँच झाल्यामुळे काही युजर्समध्ये गोंधळ आहे. iPhone 16e की iPhone 16 नक्की कोणता आयफोन खरेदी करावा, यासाठी युजर्स पूर्णपणे गोंधळले आहेत. त्यामुळे आता आम्ही या दोन्ही आयफोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल तुलना करणार आहोत. ज्यामुळे तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या फीचर्स आणि तुमच्या बजेटनुसार आयफोनची खरेदी करू शकाल. (फोटो सौजन्य – Pinterest & Apple)
भारतात iPhone 16e ची किंमत 59,900 रुपयांपासून सुरू होते. हा फोन तीन स्टोरेज व्हेरिअंटध्ये लाँच करण्यात आला आहे. iPhone 16e ग्राहक काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायामध्ये खरेदी करू शकता. iPhone 16 ची किंमत भारतात 79,900 रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे किंमतीच्या बाबतीत iPhone 16e परवडणारे मॉडेल आहे. iPhone 16e च्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 59,900 रुपये आहे. याशिवाय, त्याच्या 256 जीबी व्हेरिअंटची किंमत 69900 रुपये आणि 512 जीबी व्हेरिअंटची किंमत 89900 रुपये आहे. iPhone 16 सिरीजमधील बेस मॉडेलच्या 128GB व्हेरिअंटची किंमत 79,900 रुपये आहे, 256GB व्हेरिअंटची किंमत 89,900 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत 1,09,900 रुपये आहे.
iPhone 16 मध्ये डायनॅमिक आयलंड आहे, तर नवीन आयफोनच्या डिस्प्लेमध्ये नॉच देण्यात आला आहे. या दोन्ही आयफोन्सचा डिस्प्ले साईज सारखाच आहे, पण iPhone 16 सोबत तुलना करता iPhone 16e चा पीक ब्राइटनेस थोडा कमी आहे. iPhone 16e मध्ये ग्लास बॅक आहे, तर iPhone 16 मध्ये कलर इन्फ्युज्ड ग्लास बॅक आहे.
iPhone 16 मध्ये कॅमेरा कंट्रोल्स आणि 12 एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे, तर iPhone 16e मध्ये या दोन्हींची कमी आहे. iPhone 16 मध्ये ऑप्टिकल झूमसाठी तीन पर्याय आहेत, तर नवीन मॉडेलमध्ये त्यासाठी फक्त दोन पर्याय उपलब्ध आहेत. iPhone 16 अनेक वेगवेगळ्या कलर व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता तर iPhone 16e केवळ पांढरा आणि काळा या दोनचं रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहे.
iPhone 16e मध्ये 7.5 वॅट पर्यंत Qi वायरलेस चार्जिंग मिळते, तर iPhone 16 मध्ये 15 वॅट पर्यंत Qi2 वायरलेस चार्जिंग मिळते. iPhone 16 25W पर्यंत मॅगसेफ वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो आणि मॅगसेफ केसेस, वॉलेट आणि वायरलेस चार्जर्सशी सुसंगत आहे, परंतु ही वैशिष्ट्ये iPhone 16e मध्ये उपलब्ध नाहीत.