iPhone 17 Series launch: भारतीयांचा आवडता iPhone कोणता आहे? iPhone 17 लाँचपूर्वी समोर आला नवा अहवाल
9 सप्टेंबर रोजी म्हणजेच आज आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये 4 मॉडेल्सचा समावेश असणार आहे. सध्या सर्वत्र आयफोन 17 ची चर्चा सुरु असतानाच आता एक अनोखा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतातील युजर्सना कोणत्या प्रकारचा आयफोन खरेदी करणं पसंत आहे. हा रिपोर्ट सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंतच्या आकड्यांवर आधारित आहे.
भारतीयांचा सर्वाधिक पसंत असलेला आयफोन म्हणजे काळ्या रंगाचा आयफोन आहे. रिपोर्टनुसार, आयफोनच्या एकूण विक्रीमध्ये काळ्या रंगाच्या आयफोनचा हिस्सा 26.2 टक्के आहे. यानंतर निळ्या रंगाच्या आयफोनचा हिस्सा 23.8 टक्के आहे आणि सफेद रंगाच्या आयफोनचा हिस्सा 20.2 टक्के आहे. त्यामुळे भारतीयांना ग्राहकांमध्ये पसंत असलेल्या आयफोनमध्ये काळा, निळा आणि सफेद या तीन रंगाचा समावेश होतो. सादर करण्यात आलेल्या रिपोर्टवरून हे स्पष्ट आहे की भारतीय यूजर्स सिंपल आणि क्लासिक रंगांना अधिक महत्त्व देतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्टोरेजबद्दल बोलायचं झालं तर 128GB स्टोरेज वाला iPhone भारतीयांची पहिली पसंती आहे. एकूण विक्रीपैकी जवळजवळ एक तृतीयांश विक्री या मॉडेलने केली. 256GB मॉडेलचा हिस्सा 24.4 टक्के आहे, मात्र 512GB आणि1TB स्टोरेज वाल्या iPhone ची मागणी अत्यंत कमी झाली आहे, हा आकडा 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. यावरून असे दिसून येते की भारतीय ग्राहकांना प्रीमियम ब्रँडचा अनुभव हवा आहे, परंतु त्यांचे बजेट आणि गरजा देखील लक्षात ठेवाव्यात.
रिपोर्टनुसार, भारतातील ग्राहकांना आयफोनचे बेस मॉडेल सर्वाधिक पसंत आहे. त्याची विक्री प्रो मॉडल्सच्या तुलनेत अनेक पटीने जास्त आहे. एकूण विक्रीत नॉन-प्रो मॉडेल्सचा वाटा 86 टक्के होता. तर प्रो मॉडेल्सचा वाटा फक्त 14 टक्के होता. विशेषत: iPhone 16, iPhone 16e आणि स्टँडर्ड वर्जनची विक्री 87 टक्क्यांहून अधिक आहे. तर मोठ्या डिस्प्लेवाल्या Plus आणि Pro Max मॉडेलची विक्री 12.5 टक्क्यांपर्यंत आहे. या ट्रेंडवरून असे दिसून येते की भारतीय ग्राहक मोठ्या आणि महागड्या फोनपेक्षा मध्यम श्रेणीचे आणि सामान्य आकाराचे मॉडेल निवडत आहेत.
राज्यांबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रात आयफोनची विक्री सर्वाधिक होत आहे. इथे 25 टक्के ग्राहकांनी आयफोनची खरेदी केली आहे. यानंतर गुजरातमध्ये 11 टक्के आणि दिल्लीमध्ये 10 टक्के आयफोनचे ग्राहक आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजेच आयफोन खरेदी करणाऱ्या प्रत्येक पाच ग्राहकांपैकी एका ग्राहकाने (20.5 टक्के) त्यांचे जुने आयफोन नवीन मॉडेलने बदलले आहेत. त्याच वेळी, 17 टक्के खरेदीदारांनी त्यांच्या डिव्हाइसचे संरक्षण करण्यासाठी अॅपलकेअर कव्हर देखील घेतले.