iPhone नंतर आता Apple च्या या प्रोडक्टचीही भारतात होणार निर्मिती, काय आहे कंपनीचा प्लॅन? जाणून घ्या
टेक जायंट कंपनी Apple ने एक मोठा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी Apple त्यांच्या बेस्ट प्रोडक्ट्सपैकी एक असलेल्या iPhone ची निर्मिती भारतात करण्यास सुरुवात केली. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा भारताला आणि भारतीयांना मोठा फायदा झाला. कारण कंपनीच्या या निर्णयानंतर आता भारतातील लोकांना आयफोनच्या निर्मितीसाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. आता भारतातील लोकं मेड इन इंडिया आयफोनचा वापर करू शकतात.
आयफोनसोबतच आता कंपनीने त्यांच्या आणखी एका प्रोडक्टची निर्मिती भारतात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रोडक्ट म्हणजे Apple चे एअरपॉड्स. Apple ने भारतात एअरपॉड्स असेंबल करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आधीच भारतात आयफोनचे उत्पादन करत आहे आणि आता एअरपॉड्स असेंबल करण्यासही सुरुवात करणार आहे. गेल्या काही काळापासून, Apple चीनवरील आपले अवलंबित्व कमी करत करण्याच्या तयारीत आहे आणि भारत आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये उत्पादन आणि असेंबली सुरू करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंडियाटुडेच्या अहवालानुसार, Apple पुढील महिन्यापासून भारतात एअरपॉड्स असेंबल करण्यास सुरुवात करेल. एप्रिलपासून फॉक्सकॉनच्या हैद्राबाद येथील प्लांटमध्ये एअरपॉड्स असेंबली सुरू होईल. गेल्या वर्षी दोघांमध्ये याबद्दल चर्चा झाली होती आणि आता एप्रिलपासून असेंबली सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की भारतात असेंबल केलेले एअरपॉड्स स्थानिक बाजारात विकले जाणार नाहीत आणि निर्यात केले जातील.
गेल्या महिन्यात Apple ने सांगितले होते की आयफोन 16 सिरीजमधील सर्व मॉडेल्स भारतात तयार केले जात आहेत. गेल्या महिन्यात लाँच झालेला iPhone 16e देखील भारतातच तयार केला जाईल. येथे बनवलेले मॉडेल भारतीय बाजारपेठेसह जगातील इतर बाजारपेठांमध्ये विकले जात आहेत. कंपनीने आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्ससह भारतात पहिल्यांदाच त्यांच्या प्रो मॉडेल्सचे उत्पादन सुरू केले आहे. पूर्वी, कंपनी भारतात फक्त एंट्री-लेव्हल मॉडेल्स असेंबल करत होती. या सर्व प्रोडक्ट्सनंतर आता Apple चे एअरपॉड्स देखील भारतात असेंबल केले जाणार आहेत.
Apple 2017 पासून भारतात आयफोन असेंबल करत आहे. कंपनीने त्याची सुरुवात SE सीरीजने केली. यानंतर, भारतात आयफोन 12, आयफोन 13, आयफोन 14 आणि 14 प्लस आणि आयफोन 15 असेंबल करण्यात आले आहेत. भारतात असेंबल केलेला आयफोन 15 पहिल्या दिवसापासून विक्रीसाठी उपलब्ध होता. आता आयफोन 16 सीरीजसह, कंपनीने भारतातही त्याचे उत्पादन सुरू केले आहे. भारतात Apple चे आधीच दोन स्टोअर्स आहेत आणि चार नवीन स्टोअर्स उघडण्याची तयारी सुरू आहे.