भारतात Starlink च्या एंट्रीची तयारी, लवकरच सुरु होणार सर्विस! एका महिन्याच्या रिचार्जची काय असणार किंमत?
भारतात गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की, लवकरच भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरु केली जाणार आहे. अमेरिकेतील उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सद्वारे भारतात ही इंटरनेट सेवा सुरु केली जाणार आहे. स्टारलिंकच्या सेवेमुळे भारतात फार मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. कारण भारतातील ज्या भागांमध्ये आतापर्यंत इंटरनेट सेवेची समस्या होती, अशा दुर्गम भागांमध्ये आता स्टारलिंकच्या मदतीने इंटरनेट सेवा सुरु केली जाणार आहे.
अशी माहिती समोर आली होती की, बांगलादेशात स्टारलिंकला मान्यता देण्यात आली असून लवकरच ही सेवा बांगलादेशात सुरु केली जाणार आहे. त्यानंतर आता लवकरच ही सेवा बांगलादेशात देखील सुरु केली जाण्याची शक्यता आहे. हे तंत्रज्ञान पारंपारिक मोबाइल टॉवर्स आणि फायबर नेटवर्कवर अवलंबून नाही, तर लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये फिरणाऱ्या हजारो उपग्रहांद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करते. म्हणजेच ज्या भागांत इंटरनेट सेवेचा अभाव आहे, अशा ठिकाणांमधील लोकांसाठी ही सेवा बेस्ट ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ज्या ग्रामीण आणि दुर्गम भागात नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या समस्या अजूनही आहेत तिथे जलद इंटरनेट प्रदान करणे हे एलन मस्कच्या स्टारलिंकचे उद्दिष्ट आहे. स्टारलिंकची सेवा कशी असेल आणि एका महिन्याचा रिचार्ज किती महाग असू शकतो हे जाणून घेऊ. स्टारलिंकने भारतातील टेलिकॉम कंपन्यांसोबत हातमिळवणी देखील केली आहे, त्यामुळे स्टारलिंकची सेवा लवकरच भारतात सुरु होण्याची शक्यता आहे.
भारतात स्टारलिंकच्या लाँचची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. कंपनी सरकारकडून परवाना प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. रिपोर्ट्सनुसार, स्टारलिंक भारतात ब्रॉडबँड-स्तरीय हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करेल. या इंटरनेट सेवेची किंमत किती असेल याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी देखील असा अंदाज वर्तवला जात आहे की, स्टारलिंकच्या सेवेसाठी दरमहा 9,000 ते 10500 रुपये मोजावे लागू शकतात. जरी, या किमती अमेरिकेसारख्या देशांच्या बरोबरीच्या आहेत, परंतु भारतात या किमतीचा सामान्य वापरकर्त्यांच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो.
ही सेवा सुरू करण्यासाठी, एक विशेष स्टारलिंक किट खरेदी करावी लागेल, ज्यामध्ये सॅटेलाइट डिश, राउटर आणि इन्स्टॉलेशन सपोर्ट असेल. या हार्डवेअर किटची किंमत 30,000 ते 50,000 रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. पहिल्या वर्षाचा एकूण खर्च सुमारे 1.5 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो, तर त्यानंतरच्या वर्षांमध्ये फक्त मासिक सेवा शुल्क भरावे लागेल.
स्टारलिंक इंटरनेट स्पीड 100 एमबीपीएस ते 200 एमबीपीएस पर्यंत असू शकतो. याव्यतिरिक्त, पारंपारिक ब्रॉडबँडच्या तुलनेत लेटन्सी देखील कमी असेल, ज्यामुळे स्ट्रीमिंग, गेमिंग आणि व्हिडिओ कॉलिंग सारख्या सेवांचा अनुभव खूप चांगला होईल. जर सरकारकडून सर्व आवश्यक परवानग्या वेळेवर मिळाल्या तर वर्षाच्या अखेरीस स्टारलिंक सेवा भारतात सुरू होऊ शकतात.