Samsung नवीन Tri-Fold स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
22 जानेवारी रोजी सॅन जोस, कॅलिफोर्निया येथे सॅमसंगचा अनपॅक्ड 2025 हा ईव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने नवीन फ्लॅगशिप Galaxy S25 सिरीज लाँच केली. या सिरीजमध्ये कंपनीने Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra हे मॉडेल लाँच केले. तसेच इतर अनेक प्रोडक्ट्स देखील या ईव्हेंटमध्ये लाँच करण्यात आले. कंपनीने यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली.
येत्या काही कंपनी आपला पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन लाँच करणार असल्याची घोषणा ईव्हेंटमध्ये करण्यात आली. Galaxy S25 सिरीजनंतर आता सर्वांचं लक्ष कंपनीच्या ट्राय-फोल्ड स्मार्टफोनकडे लागलं आहे. या नव्या स्मार्टफोनमुळे सॅमसंग स्मार्टफोन तंत्रज्ञानात एक नवीन पाऊल टाकणार आहे. या कार्यक्रमादरम्यान आगामी ट्राय-फोल्ड स्मार्टफोनची सर्व महत्त्वाची माहिती शेअर करण्यात आली. जर तुम्ही देखील आगामी सॅमसंग ट्राय-फोल्ड स्मार्टफोनची वाट पाहत असाल, तर आता आम्ही तुमच्यासोबत या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स शेअर करणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंगने त्याच्या ‘अनपॅक्ड इव्हेंट’मध्ये पहिल्या ट्राय-फोल्ड स्मार्टफोनची घोषणा केली आणि डिव्हाइस विकासाच्या टप्प्यात असल्याची पुष्टी देखील केली. कंपनीने या आगामी स्मार्टफोनच्या लॉचिंग टाइम लाइनबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केली नाही. मात्र येत्या काही दिवसांत आगामी सॅमसंग ट्राय-फोल्ड स्मार्टफोनबद्दल आणखी अपडेट्स समोर येण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, लीक आणि रिपोर्ट्सच्या आधारे, सॅमसंगच्या ट्राय-फोल्ड स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि डिझाइनबद्दल काही महत्त्वपूर्ण तपशील समोर आले आहेत. ज्यामुळे Galaxy S25 सिरीज प्रमाणे हा आगामी ट्राय फोल्ड स्मार्टफोन देखील इतर स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवू शकतो.
सॅमसंग ट्राय-फोल्ड स्मार्टफोनच्या संदर्भात लीक आणि अफवांनुसार, डिव्हाइस 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. तर त्याचे कंपोनेंट प्रोडक्शन 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. सॅमसंगच्या या ट्राय-फोल्ड स्मार्टफोनमध्ये 9.9 ते 10 इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना टॅबलेटसारखा अनुभव मिळेल.
सॅमसंगच्या ट्राय-फोल्ड स्मार्टफोल्डमध्ये जी-टाईप फोल्डिंग मेकॅनिझम असण्याची अपेक्षा आहे, जी स्क्रीनला तीन आतील बाजूंनी फोल्ड करते आणि डिस्प्लेचे संरक्षण सुनिश्चित करते. सॅमसंगच्या प्रतिस्पर्धी Huawei च्या Mate XT च्या S-आकाराच्या डिझाईनपेक्षा हे डिझाइन वेगळे आहे, जे वेगळ्या फोल्डिंग यंत्रणा वापरते. समोर आलेल्या काही अहवालांनुसार, सॅमसंगने यावर्षी आपल्या ट्राय-फोल्ड स्मार्टफोनची केवळ 200,000 युनिट्स लाँच करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याशिवाय, कंपनी आणखी तीन फोल्डेबल फोन Galaxy Z Fold7, Galaxy Z Flip7 आणि Galaxy Z Flip FE लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र कंपनीने या स्मार्टफोनच्या लाँच डेटबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.