सरकार देतेय मोफत लॅपटॉप? काय आहे सोशल मीडियाच्या व्हायरल दाव्यामागील सत्य? जाणून घ्या
सोशल प्लॅटफॉर्मवर अनेक खोटे दावे केलेले व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे काही व्हिडीओ क्रिएटर्स असतात जे व्ह्यूज आणि सबस्क्राईबर्स वाढवण्यासाठी फेक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करतात. असे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमधील दावे लोकं खरे मानतात आणि मोहाला बळी पडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ Techtalkwithsakshi नावाच्या युट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार सर्वांना मोफत लॅपटॉप देत आहे.
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवर व्हायरल होत असलेला हा एक शॉर्ट व्हिडीओ आहे. सरकार प्रत्येकाला मोफत लॅपटॉप देत असल्याचे Techtalkwithsakshi नावाच्या युट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. जर तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे. कारण अद्याप सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये प्रेजेंटर म्हणत आहे की, सरकार मोफत लॅपटॉप देत आहे, तुम्ही विद्यार्थी आहात, इंटर्नशिप करत आहात, गृहिणी किंवा व्यावसायिक आहात. तुम्ही सर्वजण या मोफत लॅपटॉपसाठी पात्र आहात. अर्ज करू शकता. तसेच, मोफत लॅपटॉप मिळवण्यासाठी आपण कशा प्रकारे अर्ज करू शकतो, हे देखील व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे.
व्हिडीओमध्ये करण्यात आलेल्या दाव्याबाबत आता PIB Fact Check ने सत्य सांगितलं आहे. सरकारने या व्हिडिओमध्ये केलेले दावे फेटाळले आहेत. सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेक युनिटने म्हटले आहे की एका व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार ‘पंतप्रधान मोफत लॅपटॉप योजने’ अंतर्गत प्रत्येकाला मोफत लॅपटॉप देत आहे. हा दावा खोटा आहे. जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करत सरकारने अशी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
⚠️Fake Scheme Alert!
चैनल ‘Techtalkwithsakshi’ के एक #YouTube शॉर्ट्स में दावा किया जा रहा है कि सरकार ‘प्रधानमंत्री फ्री लैपटॉप योजना’ के तहत सभी को मुफ्त लैपटॉप प्रदान कर रही है#PIBFactCheck
❌यह दावा फर्जी है
✅सतर्क रहें! केन्द्र सरकार यह योजना नहीं चला रही है pic.twitter.com/uszRHRZ5NN
— PIB Fact Check (@PIBFactCheck) February 2, 2025
सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत सावध राहण्याची गरज आहे. काही लोक व्ह्यूज मिळवण्यासाठी खोटे दावे करतात, तर सायबर ठग देखील लोकांना फसवण्यासाठी मोठे दावे करून व्हिडिओ शेअर करत असतात. यामध्ये लोकांना मोफत सरकारी योजनांचे लाभ, शेअर बाजारातील गुंतवणूक आदींचे आमिष दाखवून फसवले जाते. एकदा त्यांनी विश्वास जिंकला की ते खूप नुकसान करू शकतात.