9 राजवाड्यांनी युक्त एक भव्य किल्ला जिथे दडवण्यात आलं आहे गडगंज सोनं! जाण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागेल
आपला देश हा अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन गोष्टींनी समृद्ध आहे. देशात अशा अनेक वास्तू आहेत, ज्यांच्या कथा आणि रहस्ये आजही तितकेच प्रचलित आहेत. यातीलच काही वस्तू अशाही असतात की, ज्यांचा रचना आपण एकदा पाहिली की त्यांना कधीच विसरता येत नाही. असाच एक किल्ला राजस्थानच्या बिकानेरमध्ये स्थित आहे. याचे नाव आहे जुनागड किल्ला. शत्रूंच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. या किल्ल्याबाबत अनेक कथा आणि रहस्यमयी गोष्टी प्रसिद्ध आहेत. या किल्ल्याचे नाव ऐकताच अनेकांना यातील खजिना डोळ्यासमोर दिसू लागतो, यामागचे कारण आणि याचा प्राचीन इतिहास आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगत आहोत.
महाराजा राव बिका यांनी 15 व्या शतकात जुनागड किल्ला बांधला. संपूर्ण किल्ल्यावर लाल दगडाचे काम आणि राजस्थानी राजपूत शैली कोरण्यात आली आहे. राजधानी सुरक्षित करण्यासाठी महाराजांनी हा किल्ला बांधल्याचे सांगण्यात येते. या किल्ल्याच्या आत अनेक गुप्त दरवाजे आणि अनेक गुहा देखील तयार करण्यात आल्या आहेत, जेणेकरून शत्रूंना इच्छा असूनही यावर हल्ला करता येणार नाही. या किल्ल्याच्या आत बांधण्यात आलेले राजवाडे इतके खास आहेत की यातील तंत्रज्ञान पाहून लोक आजही अचंबित होतात. जसे की या किल्ल्याच्या आतील बादल महाल कडक उन्हातही थंडगार राहतो.
या किल्ल्यात फुल महाल, क्वीन्स पॅलेस, अनूप महल, मोती महल आणि गर्भ गंगा विलास असे एकूण 9 राजवाडे बांधण्यात आले आहेत. हरमंदिर साहिब आणि लक्ष्मी नारायण मंदिर देखील येथे बांधले आहे. या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला हत्ती पोल आणि पश्चिमेकडील दरवाजाला मेहरान दरवाजा असे नाव देण्यात आले आहे. जुनागड किल्ल्यात एक संग्रहालयदेखील आहे.
हा किल्ला आजतोवर इतका प्रसिद्ध असण्याचे आणखीन एक कारण म्हणजे यात दडलेला खजिना. जुनागड किल्ल्यातील खजिन्याचे रहस्य आजपर्यंत बाहेर आले नाही. काही दिवसांपूर्वीच या किल्ल्याच्या दरीतून काही सोन्याची बिस्किटे सापडली होती. या किल्ल्याच्या विविध भागात महाराजांनी खजिना लपविला होता, जो आजही त्याजागी तसाच दडलेला आहे, असे स्थानिक लोकांची मान्यता आहे. या किल्ल्याच्या भूमीला सोन्याची भूमी असेही म्हटले जाते.
हेदेखील वाचा – बांगलादेशच्या शेख हसीनाप्रमाणे ‘या’ देशांच्या प्रमुखांनीही सोडली आपली खुर्ची! भारतावरही अशी स्थिती येईल?
पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याने वापरलेले द्विपंखी विमान आजही या किल्ल्यात उभे आहे. महाराजा गंगा सिंग यांना ब्रिटिशांनी हे विमान भेट दिले होते. अनेक दशकांपासून हे विमान येथे उभे आहे.
जुनागड किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला 50 रुपयांचे तिकीट काढावे लागेल. विद्यार्थ्यांना 20 रुपयांची सूट मिळेल. त्याचबरोबर परदेशींसाठी या किल्ल्याचे तिकीट 300 रुपये आहे. किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला बस, ट्रेन किंवा कारने बिकानेर गाठावे लागेल. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा किल्ला पर्यटकांसाठी खुला असतो.