
गुहागरच्या पर्यटनाची लाट ओसरली; पावसाळी पर्यटनावर मंदीचे सावट, व्यावसायिका पर्यटन हंगामाच्या प्रतीक्षेत
गुहागर : गुहागर येथे जून महिना अखेरपर्यंत पर्यटकांची रेलचेल असल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. पावसाळी दिवसात पर्यटन व्यवसायाला मंदी येत असल्याने येथील व्यावसायिकांनी आता खोल्यांची दुरूस्ती व डागडुजीच्या कामांना सुरुवात केली आहे. येणाऱ्या हंगामाच्या प्रतीक्षेत आता पर्यटन व्यावसायिक सज्ज होत आहेत.
विशाल समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा, पुरातन मंदिरे, स्थळे, गड, किल्ले असे भरगच्च सौंदर्य लाभलेल्या गुहागरला पावसाळी निसर्गसौंदर्याने साथ दिली आहे. पावसाळा म्हटले की, अवघ्या कोकणचे निसर्गसौंदर्य पर्यटकांच्या डोळ्यासमोर उभे रहाते. हिरवेगार डोंगर, त्यातून पाझरणारे लहान-मोठे ओहोळ, कोसळणारे धबधबे यांच्या सौंदर्यात भर घालते. येथील शेती, बैलांच्या जोडीने होणारी नांगरणी, शेत लावणी करणारी कष्टकरी माणसे किती अनुपम सौंदर्य येथील लाल मातीला लाभले आहे. अशा सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक पावसाळी सहलीसाठी येतात. यामध्ये पर्यटकांना अधिक भावतात ते समुद्रकिनारे.
केवळ नववर्षाचे स्वागत आणि उन्हाळी हंगामात असे वर्षातून दोनवेळा गुहागरमध्ये पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांना गुहागरचे पावसाळी निसर्गसौंदर्य नेहमीच मोहित करते. त्यामुळे भविष्यात बारमाही पर्यटन वाढण्याची अपेक्षा येथील व्यावसयिक करत असतात.
सर्व व्यवसाय पर्यटनावर अवलंबून
अलिकडे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची पावले गुहागरकडे वळताना दिसत आहेत. गुहागरचा पर्यटन हंगाम म्हणजे थर्टी फस्टचे ८ दिवस आणि उन्हाळा एवढ्यापुरताच मर्यादीत असतो. गुहागरमध्ये पर्यटक फार दिवस थांबत नाहीत अशी ओरड असते व आजही आहे. येथील सर्व व्यवसायच पर्यटनावर अवलंबून असल्याने चातकाने पावसाची वाट पाहावी, तसे येथील सर्व व्यवसायिक पर्यटन हंगामाकडे डोळे लावून असतात.
कोकणातील पर्यटनाचा केंद्रबिंदू
गुहागर हा पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. कारण चिपळूणमार्गे येणारा पर्यटक गुहागरकडून दापोलीकडे किंवा गणपतीपुळे, रत्नागिरीकडे जाण्याची सोय पाहतो. अशी दळणवळणाची व्यवस्था जलवाहतुकीद्वारे तर वाहनाद्वारेही आहे. तवसाळ ते जयगड व धोपावे ते दाभोळ अशी फेरीबोट सेवा असल्याने पर्यटकांना गुहागरचे पर्यटन सोयीचे होते. मुळातच गुहागर तालुक्याची भौगोलिक रचना चोहोबाजूंनी निसर्गसौंदर्याने नटलेली आहे.
रस्ते प्रवास करताना वाटतात मनमोहक
विशेष करुन पावसाळ्यात येथील हिरवेगार डोंगर, टेकड्या, वळणावळणाचे रस्ते प्रवास करताना मनमोहक वाटतात. हिरव्यागार निसर्गाच्या सोबतीलाच निळाशार विस्तीर्ण समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा पाहण्याचा मोह पर्यटकांना न आवरला तर आश्चर्यच.