सर्वांच्या आवडीची, दिवाळीतली शान 'सुरसुरी' फटाका कसा तयार करतात माहिती आहे का? मजेशीर आहे संपूर्ण प्रोसेस; पाहा Viral Video
दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला असून सर्वांना, खास करुन लहान मुलांना आतापासूनच फटाके फोडण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. बाजारपेठ फटाक्यांनी सज्ज झाली असून लहान मुलेच काय तर मोठेही हे फटाके फोडायला आणि खरेदी करायला तयार आहेत. दिवाळीत फटाके फोडण्याची मजाच वेगळी. आपण सर्वांनी लहानपणी सुरसुरी या फटाक्याची नक्कीच मजा लुटली असेल. पण ही सुरसुरी कशी तयार करतात ते तुम्हाला माहिती आहे का? सुरसुरी तयार करण्याची पद्धत जरा हटके आहे आणि याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की प्रथम सुरसुरीसाठी तयार केले जाणारे रासायनिक मिश्रण तयार केले जाते, ज्यामध्ये ॲल्युमिनियम पावडर, बोरिक ॲसिड आणि ऑक्सिडायझर सारखे ज्वलनशील घटक असतात. नंतर पातळ तारा एका साच्यात ठेवल्या जातात आणि या जाड मिश्रणात बुडवल्या जातात. नंतर त्या उन्हात वाळवल्या जातात. ही प्रक्रिया दोन वेळा केली जाते कारण सुरसुरीमध्ये योग्य प्रमाणात गनपावडर जमा व्हावी. शेवटी, तयार सुरसुरी कंटेनरमध्ये पॅक केले जातात आणि बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते. व्हिडिओमध्ये लोक कोणत्याही सुरक्षेशिवाय काम करताना दिसून येत आहेत जे त्याच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. सुरसुरी तयार करण्याची ही प्रक्रिया पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले असून दिवाळीच्या या दिवसांत हा व्हिडिओ आता चांगलाच शेअर केला जात आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @thefoodiehat नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या उद्योगातील कामगारांच्या आरोग्याचे काय होते याची कल्पना करा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आमचा उत्सव प्रकाशाने भरल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मेहनत दिसतेय पण सुरक्षितता दिसत नाहीये”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.