भयानक दिसणाऱ्या बाहुल्यांनी जगाला घातलीये भुरळ! 'Labubu Dall' आवडण्याचे नक्की कारण काय?
आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेत एक आगळीवेगळी बाहुली सध्या चर्चेचा विषय बनली आहे, याचे नाव लबुबू डॉल (Labubu Dall). पारंपरिक बाहुल्यांमध्ये जसा सुंदर चेहरा, लांब केस, गोंडस भाव असतो, तशी लबुबू डॉल अजिबात नाही. तिचा चेहरा एकाच वेळी गोंडस, विचित्र आणि कुरूप वाटणारा आहे. मात्र तरीही जगभरातील लोक या बाहुलीच्या प्रेमात पडले आहेत. दिसायला भयानक आणि विचित्र वाटणारी ही लबुबू डॉल आता लोकांमध्ये इतकी प्रसिद्ध का होत आहे ते जाणून घेऊया.
लबुबू डॉलचं मूळ
लबुबू ही केवळ एक खेळणी नसून एक काल्पनिक पात्र आहे. २०१५ मध्ये हाँगकाँगमधील कलाकार केसिंग लंग यांनी “The Monsters” नावाच्या मालिकेअंतर्गत ही बाहुली डिझाइन केली होती. Pop Mart ही चिनी कंपनी या बाहुल्यांचे उत्पादन करते. लबुबूची खास ओळख म्हणजे तिचे मोठे डोळे, टोकदार कान आणि नऊ दातांनी भरलेले खट्याळ हास्य.
विक्री आणि ब्लाइंड बॉक्स ट्रेंड
या बाहुल्या ब्लाइंड बॉक्समध्ये विकल्या जातात, म्हणजे खरेदी करताना तुम्हाला नेमकी कोणती आवृत्ती मिळणार आहे हे कळत नाही. ही स्ट्रॅटेजी ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढवते. एका ब्लाइंड बॉक्सची किंमत सुमारे ₹४,००० असून दुर्मीळ आवृत्त्या लाखो रुपयांना विकल्या जातात. काही मिनिटांतच या बाहुल्या विकल्या जातात, इतकी त्यांची मागणी आहे.
सेलिब्रिटींच्या पसंतीची बाहुली
लबुबू डॉलला प्रसिद्धीचा मोठा झटका मिळाला तो जेव्हा Blackpinkच्या Lisa, Rihanna, Dua Lipa, David Beckham आणि Ananya Pandey यांसारख्या स्टार्सच्या हातात ही बाहुली दिसून आली आहे. एकेकाळी विचित्र म्हणून हसल्या गेलेल्या या बाहुलीला आता फॅशन अॅक्सेसरीचा दर्जा मिळाला आहे.
सामाजिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन
डॉ. रितू अवस्थी यांच्यानुसार, आजची पिढी मीम आणि नॉस्टॅल्जिया कल्चरमध्ये मोठी झाली आहे, त्यामुळे या प्रकारची वेगळी बाहुली त्यांना आकर्षित करते. तर डॉ. प्रियंका श्रीवास्तव यांचा इशारा आहे की लहान मुलांवर अशा कुरूप डिझाईनच्या बाहुल्यांचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही मुलांना भयानक स्वप्ने पडू शकतात, त्यामुळे पालकांनी काळजीपूर्वक पावले उचलायला हवीत.
आर्थिक उलथापालथ
लबुबू डॉलमुळे Pop Mart कंपनीच्या शेअर्समध्ये ५००% वाढ झाली आहे. संस्थापक वांग निंग यांच्या संपत्तीत अब्जावधींची भर पडली. बीजिंगमध्ये एका माणसाच्या आकाराच्या लबुबू डॉलला तब्बल ₹१.२५ कोटींना विक्री झाली, ही आतापर्यंतची सर्वात महागडी लबुबू डॉल आहे.
लबुबू डॉल ही केवळ खेळणी नाही, ती एक संस्कृतीचं प्रतीक बनली आहे, जिच्या मागे वेड लागले आहे. जरी तिचा चेहरा विचित्र वाटत असला, तरीही आज ती जगभरातल्या लोकांच्या मनात घर करून बसली आहे. कधीकधी गोंडसपणाची परिभाषा बदलत असते, लबुबू डॉल त्याचं एक जिवंत उदाहरण आहे.