261 representatives are playing an active role in various political positions in 29 countries around the world
261 political representatives worldwide : भारतीय वंशाचे लोक आज जगभरात आपली ओळख फक्त उद्योगधंदे, विज्ञान किंवा कला यापुरती मर्यादित ठेवत नाहीत. तर ते जागतिक राजकारणातही प्रभावी ठसा उमटवत आहेत. २९ देशांमध्ये तब्बल २६१ भारतीय वंशाचे प्रतिनिधी वेगवेगळ्या राजकीय पदांवर कार्यरत आहेत. हे केवळ भारतासाठीच नव्हे तर लोकशाही व्यवस्थेच्या जागतिक पातळीवरील बळकटीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
भारताची लोकसंख्या प्रचंड असली तरी, ३.४३ कोटींहून अधिक भारतीय परदेशात स्थायिक आहेत. यातील अनेकांनी स्थानिक राजकारणात सक्रीय सहभाग घेतला असून, आपली कर्तृत्ववान ओळख निर्माण केली आहे. यामुळे भारतीय वंशाच्या लोकांची ओळख केवळ “स्थलांतरित” इतकी मर्यादित राहत नाही, तर ते निर्णय घेणारे आणि धोरण आखणारे झाले आहेत.
राज्यसभेत खासदार सतनाम सिंह संधू यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी महत्त्वपूर्ण आकडेवारी सादर केली. त्यांच्या उत्तरानुसार, २९ देशांमध्ये भारतीय वंशाचे निवडून आलेले प्रतिनिधी सक्रिय आहेत. त्यातील सर्वाधिक प्रतिनिधी मॉरिशसमध्ये ४५ आहेत. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम हे स्वतः भारतीय वंशाचे आहेत, ज्यामुळे त्या देशाच्या राजकारणावर भारतीयांचा किती प्रभाव आहे हे स्पष्ट होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US 50Percent Tariff : अमेरिकेचा भारतावर कर प्रहार; 50% टॅरिफमुळे ‘या’ क्षेत्रांना होणार आता गंभीर नुकसान
याशिवाय —
गयाना : ३३ प्रतिनिधी
ब्रिटन : ३१ प्रतिनिधी
फ्रान्स : २४ प्रतिनिधी
सुरीनाम : २१ प्रतिनिधी
त्रिनिदाद आणि टोबॅगो : १८ प्रतिनिधी
फिजी आणि मलेशिया : प्रत्येकी १७ प्रतिनिधी
अमेरिका : ६ प्रतिनिधी
ही आकडेवारी दर्शवते की जगाच्या विविध कोपऱ्यात भारतीय वंशाचे लोक स्थानिक लोकशाहीचे महत्त्वाचे आधारस्तंभ बनले आहेत.
जानेवारी २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जगातील २०६ देशांमध्ये ३ कोटी ४३ लाखांहून अधिक भारतीय वंशाचे लोक स्थायिक आहेत.
यापैकी सर्वाधिक लोकसंख्या अमेरिकेत – ५६ लाखांहून अधिक.
यानंतर:
सौदी अरेबिया : ४७.५ लाख
यूएई : ३९ लाख
मलेशिया : २९ लाखांहून अधिक
ब्रिटन : १३ लाखांहून अधिक
कुवेत व ऑस्ट्रेलिया : प्रत्येकी सुमारे १० लाख
विशेष म्हणजे, पाकिस्तान आणि सॅन मॅरिनो या दोन देशांमध्ये एकाही भारतीय वंशाचा नागरिक स्थायिक नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकन अब्जाधीशांचा ‘सिक्रेट प्लॅन’; भूमिगत बंकर आणि आलिशान राजवाडे तयार करण्याची का घाई?
या आकडेवारीतून स्पष्ट होते की भारतीय वंशाचे लोक केवळ स्थलांतरित कामगार राहिले नाहीत, तर त्यांनी स्थानिक समाज, संस्कृती आणि राजकारणात आपली छाप निर्माण केली आहे. आज ब्रिटनपासून अमेरिका, आफ्रिकेतील मॉरिशसपासून कॅरिबियन बेटांपर्यंत भारतीय वंशाचे लोक फक्त वोटर्स नाहीत तर नेते, खासदार, मंत्री आणि पंतप्रधान बनले आहेत. हे भारताच्या सांस्कृतिक व बौद्धिक परंपरेचे जागतिक पातळीवरील सामर्थ्य दर्शवते.
जगभरातील या उपस्थितीतून दोन संदेश मिळतात:
भारतीयांची मेहनत व कर्तृत्व कोणत्याही मर्यादेत अडकत नाही.
लोकशाही व्यवस्थेत भारतीय वंशाचे लोक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
आज भारतीय वंशाचे नेते जेव्हा परदेशातील संसदेत उभे राहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात फक्त स्थानिक समाजाची नव्हे तर भारताशी जोडलेली संस्कृतीचीही झलक दिसते. ही आकडेवारी भारतासाठी एक सॉफ्ट पॉवर आहे. ती जगाला सांगते की भारतीय कुठेही गेले तरी ते फक्त नोकरी करणारे नागरिक राहत नाहीत, तर नेतृत्व घेणारे निर्णयकर्ते बनतात.
२९ देशांतील २६१ भारतीय चेहरे हे भारताच्या जागतिक सामर्थ्याचे द्योतक आहेत. जगभर पसरलेल्या भारतीयांनी फक्त आर्थिक योगदानच दिले नाही, तर ते स्थानिक राजकारण, लोकशाही आणि नेतृत्वाच्या केंद्रस्थानी उभे राहिले आहेत. भारत “मर्यादित” नाही तर “जागतिक शक्ती” म्हणून उभी आहे, आणि या भारतीय वंशाच्या प्रतिनिधींमुळे ते अधिक ठळकपणे अधोरेखित होते.