
9-11 attacks in america 24 years ago september 11 2001 al qaeda hijacked four planes two new york
9/11 24th anniversary : ११ सप्टेंबर २००१ ही तारीख ऐकताच आजही जगभरातील लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेवर असा दहशतवादी हल्ला झाला, ज्याने इतिहास कायमचा बदलून टाकला. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर विमाने आदळून झालेल्या त्या भयानक क्षणांना आज २४ वर्षे झाली, पण त्याची भीषण आठवण आजही जिवंत आहे.
त्या दिवशी सकाळी लाखो लोक न्यूयॉर्कच्या गजबजाटात आपल्या दैनंदिन कामासाठी बाहेर पडले होते. पण काही मिनिटांतच सर्व काही उध्वस्त होणार आहे, याची कुणालाच कल्पना नव्हती. सकाळी ८:४६ वाजता अमेरिकन एअरलाइन्सचे फ्लाइट ११ थेट वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरला आदळले. फक्त १७ मिनिटांनी दुसरे विमान युनायटेड एअरलाइन्स फ्लाइट १७५ साऊथ टॉवरवर आदळले. आगीच्या प्रचंड ज्वाळा, गुदमरणारा धूर आणि कोसळणारे टॉवर्स हे दृश्य पाहून जग स्तब्ध झाले.
त्या सकाळी अल-कायदाच्या १९ दहशतवाद्यांनी चार प्रवासी विमानांचे अपहरण केले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : KP Sharma Oli : भारतासमोर नतमस्तक न झाल्यामुळे सत्तेला मुकलो; राम जन्मभूमीबाबतही ‘ओली’ यांचे धक्कादायक वक्तव्य
या हल्ल्यात २,९७७ लोकांचा मृत्यू झाला. हजारो जखमी झाले. आगीने आणि धुळीच्या ढिगाऱ्याने न्यूयॉर्क शहराला वेढून टाकले. रस्त्यांवरून लोकांनी टॉवरमधून उडी मारणाऱ्या निरपराध नागरिकांना पाहिले ती क्षणचित्रे आजही हृदयाला पिळवटून टाकतात. अमेरिकेचे प्रतीक असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटर पूर्णपणे कोसळले.
अमेरिकेला १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले. पण त्याहून मोठा धक्का म्हणजे नागरिकांच्या मनात बसलेली भीती. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज एक आठवडा बंद ठेवावे लागले. जगातील ‘सर्वात सुरक्षित देश’ या प्रतिमेलाच या हल्ल्याने जबर धक्का बसला.
घटनेनंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी जगाला उद्देशून स्पष्ट शब्दांत दहशतवादाविरुद्ध युद्ध घोषित केले. फक्त एका महिन्यात ऑक्टोबर २००१ मध्ये अमेरिका अफगाणिस्तानात प्रवेश करून तालिबान सरकार उलथून टाकले. पुढील २० वर्षे अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात तळ ठोकून राहिले. ओसामा बिन लादेन या हल्ल्याचा सूत्रधार याला अखेर २०११ मध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अमेरिकन नेव्ही सीलने ठार केले. खालिद शेख मोहम्मद, हल्ल्याचा मुख्य नियोजक, २००३ मध्ये पकडला गेला आणि ग्वांतानामो तुरुंगात ठेवण्यात आला.
९/११ नंतर जगभरात सुरक्षा व्यवस्था बदलल्या. अमेरिकेत TSA (Transportation Security Administration) स्थापन झाले. विमानतळांवर तपासणीचे नियम कडक झाले. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण जगात प्रवास, सुरक्षा व दहशतवादाविरुद्धची धोरणे यामध्ये आमूलाग्र बदल झाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Unrest : India-Nepal सीमा सील, मैत्री बस सेवा बंद; भारताने घेतला कठोर निर्णय
आज २४ वर्षे उलटून गेली असली तरी त्या दिवशी हरवलेले जीव, ओरडणारे आवाज, कोसळणारे टॉवर्स आणि रडणारे कुटुंबीय—हे सर्व अजूनही जिवंत आहे. तो दिवस फक्त अमेरिकेच्या नव्हे, तर संपूर्ण जगाच्या इतिहासातील काळा दिवस ठरला.