Nepal Unrest : India-Nepal सीमा सील, मैत्री बस सेवा बंद; भारताने घेतला कठोर निर्णय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
पाळातील गोंधळामुळे भारताने सीमा पूर्णपणे सील केली, मैत्री बस सेवा थांबवली.
जनरेशन-झेड निदर्शकांच्या पाठिंब्याने माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की या पुढील पंतप्रधान होऊ शकतात.
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळ दोन्ही देशांतील नागरिक अडकले असून, विशेष उड्डाणांची व्यवस्था सुरू.
Nepal Interim Government : नेपाळमध्ये सुरू असलेल्या तीव्र गोंधळामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या अस्थिरतेचा थेट परिणाम भारतावरही झाला आहे. सीमा पूर्णपणे सील करण्यात आली असून, महेंद्रनगर ते दिल्ली व डेहराडून या मार्गांवरील “मैत्री बस सेवा” तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेपाळमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत तर भारतात गेलेले अनेक नेपाळी नागरिकही घरी परतू शकत नाहीत.
या निर्णयामुळे व्यवसाय, व्यापार आणि रोजच्या प्रवासावर मोठा परिणाम झाला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत, सीमा भागातील लोकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. गुप्तपणे सुरू असलेल्या सीमा ओलांडण्याच्या हालचालींवर आता अधिक कठोरपणे लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, नेपाळमधील हिंसाचाराचा आणखी एक परिणाम म्हणजे तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्यांचा विषय. आतापर्यंत ३५ कैदी सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) पकडले आहेत. यामध्ये २२ उत्तर प्रदेश सीमेवर, १० बिहारमध्ये तर तीन कैदी पश्चिम बंगालमध्ये पकडले गेले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगाची विध्वंसाच्या दिशेने वाटचाल! 54 देशांच्या GDPइतकी संपत्ती फक्त शस्त्रांवर खर्च; शांतात अन् उपासमारीकडे दुर्लक्ष
या गोंधळाच्या वातावरणात, नेपाळमध्ये आता राजकीय स्थैर्य मिळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जनरेशन-झेडच्या निदर्शकांनी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांचे नाव पुढील पंतप्रधानपदासाठी सुचवले असून, त्यांना पाठिंबा दिला आहे. आज होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, नेपाळी लष्करप्रमुख आणि जनरेशन-झेडचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीनंतर अंतरिम सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाच्या खासदार शोबिता गौतम यांनी संसद बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संसद चालू ठेवूनही अंतरिम नागरी सरकार स्थापन होऊ शकते. या संकटाच्या काळात भारतातील विमान कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. एअर इंडियानंतर आता इंडिगो एअरलाइन्स ने काठमांडूसाठी विशेष उड्डाणे जाहीर केली आहेत. ११ सप्टेंबरपासून दररोज ४ उड्डाणे सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
नेपाळमधील स्थानिक नेते आणि कार्यकर्तेही लोकांना धीर देत आहेत. काठमांडूचे महापौर बालेन शाह यांनी सोशल मीडियावरून जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, देश एका नवीन भविष्याच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि अंतरिम सरकारद्वारे लवकरच निवडणुका घेण्यात येतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : KP Sharma Oli : भारतासमोर नतमस्तक न झाल्यामुळे सत्तेला मुकलो; राम जन्मभूमीबाबतही ‘ओली’ यांचे धक्कादायक वक्तव्य
नेपाळी काँग्रेसचे नेते प्रदीप पौडेल यांनीही आपले मत मांडताना लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे हीच खरी वेळ असल्याचे सांगितले. त्यांनी कायद्याचे राज्य मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सध्या परिस्थिती गंभीर असली तरी, सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार नेपाळला एका नव्या मार्गावर नेऊ शकते, अशी आशा लोकांमध्ये आहे. परंतु त्यासाठी हिंसाचार थांबणे आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात स्थैर्य परत येणे अत्यावश्यक आहे.