A steady beat beneath Ethiopia’s Afar may split the continent and form a new ocean
Ethiopia Afar rift : आफ्रिकेतील इथिओपियामध्ये वैज्ञानिकांनी एक अद्भुत आणि थक्क करणारा शोध लावला आहे. या शोधानुसार, इथिओपियाच्या अफार प्रदेशाच्या जमिनीखाली शास्त्रज्ञांना हृदयाच्या ठोक्यांसारखी लयबद्ध हालचाल जाणवली आहे. ही हालचाल केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर भौगोलिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या क्रियाशीलतेमुळे आफ्रिका खंड तुटू शकतो आणि भविष्यात एक नवीन महासागर तयार होऊ शकतो.
या अनोख्या संशोधनाचे नेतृत्व साउथहॅम्प्टन विद्यापीठाच्या संशोधन पथकाने केले असून त्यांनी अफार प्रदेशातील जमिनीखालील हलचालींचे बारकाईने निरीक्षण केले आहे. या हालचालींचा स्रोत म्हणजे पृथ्वीच्या आतील भागात असलेला वितळलेला मॅग्मा, जो वरच्या दिशेने दाब देत आहे. या दाबामुळे टेक्टोनिक प्लेट्स म्हणजेच पृथ्वीचे भूपृष्ठ विभाग एकमेकांपासून हळूहळू दूर जात आहेत, आणि त्यामुळे आफ्रिकेच्या भूमीमध्ये फटी पडत आहेत.
शास्त्रज्ञांच्या मते, टेक्टोनिक प्लेट्स जेव्हा एकमेकांपासून दूर जाऊ लागतात, तेव्हा त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला ताण देतात आणि त्याचे कवच पातळ होते. ही प्रक्रिया खूपच संथ असून, लाखो वर्षांनंतर त्या ठिकाणी खंड तुटून एक नवीन महासागर तयार होऊ शकतो. याबाबत स्पष्टीकरण देताना संशोधनाचे सह-लेखक डेव्हिड कीर म्हणतात, “अफार प्रदेशाखाली असलेला ‘मेंटल प्लम’ म्हणजे पृथ्वीच्या आतील भागातील उष्ण, वितळलेला पदार्थ, जो वर येत आहे. हाच प्लम टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीसाठी जबाबदार आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराण हट्टाला पेटला! अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही ‘Fordow Nuclear Power Plant’च्या सॅटेलाईट प्रतिमा पाहून इस्रायल अस्वस्थ
या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी अफार प्रदेश आणि इथिओपियन रिफ्ट या भागांतील ज्वालामुखीय खडकांचे 130 पेक्षा अधिक नमुने गोळा केले. या नमुन्यांच्या रासायनिक विश्लेषणातून जमिनीखालील हालचालींचे स्वरूप आणि तीव्रता स्पष्ट झाली आहे. त्याचबरोबर शास्त्रज्ञांनी या डेटाचे विश्लेषण प्रगत सांख्यिकीय मॉडेल्स वापरून केले आहे, ज्यामुळे त्यांनी जमिनीखाली घडणाऱ्या घडामोडींचा खोल अभ्यास करू शकला.
हा भूगर्भीय बदल एक दिवसात घडणारा नाही. हा संपूर्ण प्रक्रियात्मक प्रवास अत्यंत संथ आहे आणि लाखो वर्षांनंतरच त्याचे परिणाम दिसून येतील. मात्र, शास्त्रज्ञांच्या मतानुसार, ही प्रक्रिया सुरु झाली आहे आणि तिचा वेग लक्षात घेतल्यास, पूर्व आफ्रिकेतील अनेक भाग भविष्यात वेगळे होऊन समुद्राने व्यापले जाण्याची शक्यता आहे.
कीर पुढे म्हणतात, “जमिनीखाली होणाऱ्या या हालचालींमुळे पृष्ठभागावर भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि खंडाच्या तुकड्यांमध्ये वाढ होऊ शकते. जिथे टेक्टोनिक प्लेट्स सर्वात पातळ असतात, तिथे या क्रिया अधिक तीव्रपणे घडतात.” हा शोध केवळ इथिओपियापुरता मर्यादित नाही, तर तो जगभरातील टेक्टोनिक क्रियांच्या अभ्यासासाठी एक नवा दृष्टिकोन निर्माण करतो. हे स्पष्ट होते की पृथ्वीच्या आतील हालचाली मानवजातीच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सिंधू पाणी करारावरून भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने; लवाद न्यायालयाच्या निर्णयाने पाकिस्तान आनंदित, भारताचा स्पष्ट नकार
इथिओपियाच्या अफार प्रदेशात सुरू असलेल्या हृदयाच्या ठोक्यांसारख्या लयबद्ध हालचालींनी संपूर्ण वैज्ञानिक समुदायाचे लक्ष वेधले आहे. ही प्रक्रिया लाखो वर्षांनंतर एक नवीन महासागर निर्माण करेल, आणि यामुळे जगाच्या भूप्रदेशाच्या नकाशात आमूलाग्र बदल घडेल. आफ्रिकेच्या अंतर्भूत अंतरात सुरू असलेल्या या ‘धकधक’चा आवाज, एक नवीन भौगोलिक युग सुरू होण्याची नांदी ठरू शकतो.