
फोटो सौजन्य AI
अमेरिकेच्या सरकारी तपास यंत्रणेने ChatGPT, Claude, Gemini आणि Grok या चार लोकप्रिय AI प्लॅटफॉर्मची चाचणी केली. २०२६ च्या वसंत ऋतूमध्ये करण्यात आलेल्या या चाचणीत दोन प्लॅटफॉर्मनी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी घडवू शकणाऱ्या स्फोटक हल्ल्याच्या नियोजनासाठी माहिती दिली. तर अन्य दोन प्लॅटफॉर्मनी अमेरिकेच्या वीज वितरण यंत्रणेला लक्ष्य करण्यासंबंधी माहिती पुरवली.
या चाचण्यांमध्ये हल्ल्यांचे संभाव्य लक्ष्य, ठिकाणे, वेळ आणि पद्धती यांसारखी माहिती मिळाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक प्लॅटफॉर्मकडून १२ तासांपेक्षा कमी वेळेत हल्ल्यांच्या नियोजनासाठी उपयुक्त माहिती मिळाली.
Saudi Arabia News : इराण युद्धामुळे सौदीचे क्राउन प्रिन्स संकटात; अर्थव्यवस्थेला मोठा फटका
AI प्लॅटफॉर्ममध्ये धोकादायक माहिती रोखण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणा कार्यरत असतात. चाचणीदरम्यान चारही प्लॅटफॉर्मनी सुरुवातीला काही विनंत्या नाकारल्या. काही ठिकाणी माहिती हटवण्यात आली, तर काही वापरकर्ता खात्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र तपासकर्त्यांनी सुरक्षा नियमांना चुकवणाऱ्या सामान्य पद्धतींचा वापर करून पुन्हा माहिती मिळवली.
यानंतर मिळालेल्या माहितीची व्यवहार्यता तपासण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. संशोधन, प्रत्यक्ष पाहणी आणि मुलाखतींच्या माध्यमातून योजनांमधील अनेक बाबी तपासण्यात आल्या. सुरक्षेच्या कारणास्तव हल्ल्यांशी संबंधित विशिष्ट ठिकाणे आणि तांत्रिक तपशील सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.
या अहवालामुळे AI तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत चिंता वाढली आहे. AI मुळे अनेक कामे कमी वेळेत पूर्ण होतात; मात्र याच क्षमतेचा वापर चुकीच्या कारणांसाठी होऊ शकतो, असे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणानंतर अमेरिकेतील सिनेटर मॅगी हसन यांनी AI सुरक्षेच्या मुद्द्यावर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, संबंधित तंत्रज्ञान कंपन्यांनी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. काही कंपन्यांनी चाचण्या जुन्या मॉडेल्सवर झाल्याचेही स्पष्ट केले. भविष्यात AI मॉडेल्स सार्वजनिक करण्यापूर्वी अधिक कठोर सुरक्षा चाचण्या घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.