An Awami League leader hinted at Sheikh Hasina's return as PM thanking India and fueling speculation
ढाका: बांगलादेशच्या अवामी लीग पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मोठा दावा करत माजी पंतप्रधान शेख हसीना लवकरच पुन्हा पंतप्रधान म्हणून बांगलादेशात परतणार असल्याचे सांगितले आहे. या दाव्यानंतर बांगलादेशातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या नेत्याने भारताचे आभार मानत भारतीय नेतृत्वाच्या भूमिकेचे कौतुकही केले आहे.
अवामी लीग अमेरिकेचे उपाध्यक्ष डॉ. रब्बी आलम यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, “शेख हसीना पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. देशातील तरुणांनी काही चुक केली असली, तरी ती त्यांची वैयक्तिक चूक नाही. त्यांना दिशाभूल करून एका कटाचा भाग बनवण्यात आले.” त्यांनी दावा केला की, गेल्या वर्षी शेख हसीना सरकार उलथवण्यासाठी जे आंदोलन झाले होते, ते एकप्रकारे दहशतवादी बंडखोरी होती. आलम यांच्या मते, बांगलादेशवर एका सुनियोजित कटाचा भाग म्हणून हल्ला करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे गांभीर्याने पाहावे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानात होणार भयंकर गृहयुद्ध! ट्रेन हायजॅकपासून ते बलुचिस्तानमधील आत्मघातकी हल्ल्यांपर्यंत मिळाले संकेत
डॉ. रब्बी आलम यांच्या म्हणण्यानुसार, “राजकीय हालचाली चालू राहणे ही लोकशाहीची गरज आहे. परंतु बांगलादेशात सध्या जे काही घडत आहे, ते केवळ राजकीय आंदोलन नसून एक दहशतवादी बंडखोरी आहे.” तसेच, त्यांनी खुलासा केला की, अवामी लीगच्या अनेक नेत्यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे. त्यांनी यासाठी भारत सरकारचे आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. “शेख हसीना यांना भारतात सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही भारताचे आभारी आहोत. भारताने आमच्या नेत्यांना मदत केली आहे आणि त्यामुळे आम्ही भारताशी कायम ऋणानुबंध जपणार आहोत,” असे आलम यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर हिंसक निदर्शने झाली. त्यानंतर, परिस्थिती अधिक बिघडल्याने शेख हसीना यांना देश सोडावा लागला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी भारतात आश्रय घेतला. ५ ऑगस्ट रोजी बांगलादेश लष्कराच्या विशेष विमानाने त्या दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर पोहोचल्या. भारताने त्यांना आपत्कालीन आश्रय देण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून त्या दिल्लीत एका अज्ञात ठिकाणी राहत आहेत.
शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर, बांगलादेशात नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. या सरकारने भारत सरकारकडे हसीनांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली आहे. बांगलादेश सरकारने अलीकडेच स्पष्ट केले की, भारताने अद्याप त्यांच्या विनंतीला कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही. सध्या बांगलादेशातील युनूस सरकारने शेख हसीना यांच्यावर अनेक खटले दाखल केले आहेत, ज्यात मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपांचाही समावेश आहे. त्यामुळे, या प्रकरणाचा पुढील घटनाक्रम काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेख हसीना यांची बांगलादेशात पुनरागमन करण्याची शक्यता आणि त्यांना मिळणारा भारताचा पाठींबा यामुळे बांगलादेशातील राजकीय परिस्थिती अजूनच तापली आहे. अवामी लीगच्या नेत्याने केलेला दावा आणि भारताचे मानलेले आभार यामुळे आगामी काही आठवड्यांत मोठ्या राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनकडे आता 600 Nuclear Weapons; जगातील सर्वात वेगवान अणुबॉम्ब बनवल्याचा ड्रॅगनचा खुलासा
बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध आणि बांगलादेशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, जागतिक स्तरावरही या घडामोडींकडे बारीक लक्ष दिले जात आहे. आता आंतरराष्ट्रीय समुदायाचा पुढील प्रतिसाद काय असेल, यावरच शेख हसीना यांच्या भवितव्याचे आणि बांगलादेशाच्या राजकीय स्थिरतेचे भवितव्य अवलंबून राहील.