India Bangladesh Relations: भारताविरुद्ध 'दहशतवादी कट' रचणाऱ्या 'या' शत्रूची बांगलादेश न्यायालयाने केली सुटका
ढाका: बांगलादेश न्यायालयाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने भारताविरोधात शस्त्रास्त्र तस्करीच्या प्रकरणात दोषी असलेल्या माजी गृहमंत्री लुफ्तोज्जमां बाबर आणि इतर पाच जणांना 18 डिसेंबर 2024 रोजी निर्दोष मुक्त केले. आता बांगलादेशने आणखी एका भारताच्या शत्रूची सुटका केली आहे. बांगलादेशच्या न्यायालयाने एका माजी मंत्री आणि बांगलादेश नॅशलिस्ट पार्टीचे सदस्य (BNP)अब्दुस सलाम पिंटू यांना 17 वर्षांनंतर जेलमधून सोडण्याचा आदेश दिला आहे. अब्दुस सलाम पिंटू यांच्यावर भारताविरोधात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा आरोप आहे. 2004 मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर ग्रेनेड हल्ल्याची कटकारस्थान रचल्याच्या प्रकरणात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्याचे अब्दुस सलाम यांचे काम
अब्दुस सलाम पिंटू यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK)आणि बांगलादेशमधील दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवली होती. त्यांनी भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुस सलाम हरकत-उल-जिहाद-अल-इस्लामी (HUJI) या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेला भारताविरोधात मदत करत असल्याचे पुरावे देखील आढळून आले होते. त्यांनी POK मध्ये दहशतवाद्यांसाठी शस्त्र खरेदी, प्रशिक्षण कार्यक्रम आणि भरती प्रक्रियेमध्ये मदत केली. तसेच, मदरशांच्या विद्यार्थ्यांना शस्त्र आणि स्फोटकांच्या प्रशिक्षणासाठी प्रेरित केले होते.
2011 मध्ये चौकशी अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, पिंटू आणि लुत्फोजामन बाबर या BNP च्या आणखी एका माजी मंत्र्यांनी बांगलादेशातील मदरशा विद्यार्थ्यांना दहशतवादी प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांना शस्त्रसज्ज करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, 2021 मध्ये ढाका न्यायालयाला चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमध्ये अब्दुस सलाम पिंटू यांनी दहशतवादी संघटनांना आर्थिक पाठबळ दिल्याचे नमूद केले होते.
त्यांच्या या कारवायांमुळे भारताविरुद्ध आतंकवाद वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान होते असे मानले जाते. बांगलादेश न्यायालयाने पिंटू यांची सुटका केली असून यामुळे भारत-बांगलादेश संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या कारवायांवर नियंत्रण ठेवणे आणि भारताविरुद्ध दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
दहशतवादी संघटना HUJI
ही संघटना भारत, बांगलादेश, इस्रायल, न्यूझीलंड, ब्रिटन आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये दहशतवादी हल्ल्यांसाठी ओळखली जाते. पाकिस्तानच्या “ब्लीड इंडिया विथ ए थाउजंड कट्स” या धोरणांतर्गत भारताविरुद्ध लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM)यांसारख्या इतर संघटनांसोबत काम करणाऱ्या HUJI ने 2006 साली वाराणसी बॉम्बस्फोट तसेच, २००७ मध्ये अजमेर शरीफ स्फोट आणि 2011 ला दिल्ली बॉम्बस्फोटांसारखे अनेक हल्ले घडवून आणण्याचे काम केले होते.