
फोटो सौजन्य सोशल मीडिया
बोलिव्हियाच्या व्हियाचा नगरपालिका परिसरातील बोलिव्हर लष्करी तळावर शुक्रवारी दुपारी सुमारे २ :३० वाजता स्फोट झाला . हा लष्करी परिसर राजधानी पाझपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर आहे . स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती कि आसपासच्या परिसरात मोठा आवाज झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले .
प्राथमिक माहितीनुसार स्फोट लष्करी तळातील पायरोटेक्निक म्हणजेच फटाक्यांच्या साहित्यांच्या साठवणूक केलेल्या परिसरात झाला . हे साहित्य संरक्षण मंत्रालयाच्या साठ्यात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .
या दुर्घटनेत किमान दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. याशिवाय ७ जण बेपत्ता असल्याचेही सांगण्यात आले आहे. स्फोटात ८१ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून काही जखमींना उपचारासाठी ला पाझमधील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.
जखमींमध्ये गंभीर भाजलेल्या नागरिकांचाही समावेश आहे. स्फोटानंतर रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
स्फोटाच्या धक्क्यामुळे लष्करी तळाच्या आसपास अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या . काही ठिकाणी इमारतींचे आणि लष्करी परिसरातील संरचनाचेही नुकसान झाले आहे . परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळा भवती सुरक्षा वाढणवण्यात आली आहे . अग्निशमन दलाने घटनास्थळी अजूनही उष्णतेचा स्रोत असल्याचा इशारा दिला आहे .
त्यामुळे आणखी स्फोट होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना घटनास्थळापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे . दरम्यान या घटनेमागे नेमके कारण सध्या तरी कळू शकले नाही . स्फोट पायरोटेक्निक साहित्यामुळे झाल्याचे प्राथमिक संकेत असले तरी त्यामागची नेमकी परिस्थिती आणि साठवणुकीतील सुरक्षा व्यवस्था याबाबत तपास सुरु आहे .