Chaos at Syria-Israel border as 1,000 Druze crossed Israel blocked infiltration Netanyahu urged restraint
Syria‑Israel Border : बुधवारी (दि. 17 जुलै 2025 ) इस्रायल-सीरिया सीमेवर अतिशय तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. सीरियातील स्वेइडा (Sweida) शहरात झालेल्या हिंसाचारात ड्रुझ समुदायातील सुमारे ३०० जणांचा मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली. या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील तब्बल 1000 ड्रुझ नागरिकांनी संतप्त होऊन सरळ सीरियाच्या दिशेने सीमा तोडली. दुसरीकडे, सीरियातूनही काही ड्रुझ नागरिक इस्रायलमध्ये शिरकाव करताना दिसले.
सीमेवर जमलेल्या ड्रुझ समुदायाच्या नागरिकांनी सकाळपासूनच तीव्र निषेध सुरू केला होता. काही वेळातच त्यांनी अचानक कुंपण फोडून सीरियात प्रवेश केला. ही घटना इतकी वेगाने घडली की आयडीएफ (इजरायली संरक्षण दल) काही समजून घेईपर्यंत सीमारेषा ओलांडली गेली होती. दुसऱ्या बाजूनेही सीरियातून ड्रुझ नागरिक इस्रायलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्यांना रोखण्यासाठी आयडीएफकडून अश्रुधुराचा वापर करण्यात आला. मात्र, अद्याप किती नागरिक सीमेवरून शिरले याचा अचूक अंदाज लावता आलेला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
स्वेइडा आणि आसपासच्या भागात गेल्या चार दिवसांपासून ड्रुझ आणि बेदौइन समुदायांमध्ये तणाव होता. यात सुमारे ३०० लोकांचा बळी गेला आहे. मृत्यूच्या या घटनांनंतर ड्रुझ समुदायात संतापाची लाट उसळली आहे आणि या घटनांनी इस्रायलमधील ड्रुझ नागरिकांनाही अस्वस्थ केलं आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या घटनेवर तात्काळ प्रतिक्रिया दिली. त्यांनी ड्रुझ समुदायाला भावनिक साद घालत असं आवाहन केलं की, “माझ्या प्रिय बांधवांनो, कृपया सीमा ओलांडू नका. सीरियामधील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तुम्ही तुमचं जीवन धोक्यात घालू नका.” ते पुढे म्हणाले, “आमचं संरक्षण दल, हवाई दल, आणि विशेष यंत्रणा काम करत आहेत. आम्ही ड्रुझ नागरिकांचे संरक्षण करू, पण यासाठी तुम्ही आमचं काम अडवू नका.” नेतन्याहू यांनी स्पष्ट केलं की सीमेचं उल्लंघन करणं हे गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य आहे.
सीरियात ड्रुझ समुदायावर होत असलेल्या हिंसाचाराचा निषेध करत इस्रायलने मोठ्या प्रमाणावर सैन्य कारवाई केली आहे. दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय, लष्कर मुख्यालय आणि स्वेइडा भागात जाणाऱ्या सीरियन सैन्याच्या तुकड्यांवर लक्ष्य करून हल्ले करण्यात आले. एकूण १६० पेक्षा जास्त ठिकाणी हवाई हल्ले केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, इस्रायलच्या हल्ल्यांचा उद्देश ड्रुझ समुदायावर होणाऱ्या अत्याचारांना रोखणं आणि सीरियन लष्कराच्या हालचालींना आळा घालणं हाच आहे, असं आयडीएफने स्पष्ट केलं आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Emoji Day : हार्ट पाठवलं आणि थेट तुरुंगात? ‘या’ देशांनी इमोजींवर लावली बंदी, काय आहे कारण?
सीमेवर दोन्ही बाजूंनी होणारी घुसखोरी, संतप्त नागरिकांचा उद्रेक, आणि सरकार-सेनांमधील कारवायांमुळे सध्या इस्रायल-सीरिया सीमारेषा अतिशय तणावपूर्ण बनली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी IDF आणि हवाई दल विशेष ऑपरेशन्स राबवत आहेत.