PM मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III' ने सन्मानित
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडा दौऱ्यावर आहेत. त्याआधी त्यांनी सायप्रसला भेट दिली. यावेळी सायप्रस सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III’ने नरेंद्र मोंदींचा सन्मान करण्यात आला. सायप्रसची राजधानी निकोसिया येथील राष्ट्रपती भवनात झालेल्या भव्य समारंभात राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सायप्रसचे पहिले राष्ट्रपती मकारियोस तृतीय यांच्या सन्मानार्थ आणि राष्ट्रसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जागतिक स्तरावरील प्रभावशाली व्यक्तींना हा सन्मान देऊन गौरव केला जातो. सन्मान स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हा पुरस्कार १४० कोटी भारतीयांना समर्पित केला. त्यांनी म्हटले, “हा सन्मान फक्त माझा नाही, तर तो भारतातील प्रत्येक नागरिकाचा आहे. हा त्यांच्या सामर्थ्य, आशा-आकांक्षा आणि सांस्कृतिक परंपरेचा सन्मान आहे. अशा भावना त्यांनी वक्त केल्या.
मोदी यांनी भारत आणि सायप्रसमधील मैत्रीला आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाशी जोडून, दोन्ही देशांतील सामायिक मूल्यं, शांतता, सुरक्षा आणि समृद्धीसाठी असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक म्हणून हा सन्मान स्वीकारला.
दोन दशकांनंतर पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानांचा सायप्रस दौरा आहे. मोदी यांचे लारनाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर सायप्रसचे राष्ट्रपती स्वतः त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यानंतर लिमासोल येथील भारतीय समुदायाने पंतप्रधानांचे मोठ्या उत्साहात स्वागत केल.
सायप्रस दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती क्रिस्टोडुलाइड्स यांच्या उपस्थितीत बिझनेस राऊंडटेबल मीटिंग झाली, ज्यामध्ये दोन्ही देशांतील प्रमुख उद्योजक सहभागी झाले होते. मोदी यांनी भारतातील आर्थिक सुधारणा, उद्यमशीलतेचा आढावा घेतला व सायप्रससोबत ऊर्जा, तंत्रज्ञान आणि नवकल्पना क्षेत्रात भागीदारीच्या संधी असल्याचं म्हटलं आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी, “हा सन्मान भारत-सायप्रस मैत्रीचा प्रतीक असून, तो १४० कोटी भारतीयांना समर्पित आहे. ही शांती, प्रगती आणि समृद्धीसाठीच्या आमच्या सामायिक प्रयत्नांची साक्ष असल्याचं म्हटलं आहे. सायप्रस प्रेसिडेंसीनेही अधिकृत निवेदनात म्हटले की, “भारत आणि सायप्रस नव्या भागीदारीच्या युगात प्रवेश करत आहेत. आम्ही आर्थिक सहकार्य अधिक बळकट करत असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस III हा पुरस्कार केवळ सन्मानच नव्हे, तर भारताच्या जागतिक प्रतिष्ठेचा, मजबूत राजनयिक धोरणाचा आणि द्विपक्षीय संबंधांच्या सखोलतेचा ठोस पुरावा आहे. हा क्षण भारत-सायप्रस मैत्रीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला आहे, जो भविष्यातील व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्याच्या दिशेने एक नवा अध्याय असू शकतो.