Elon Musk to buy TikTok from China here’s the report
बिजिंग: अमेरिकेत टिकटॉक वर बंदी लादली जाण्याच्या शक्यतांदरम्यान चीनकडून एक चकित करणारी बातमी समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जर अमेरिकेने टिकटॉक वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला तर टिकटॉक ची मूळ कंपनी टिकटॉक हे व्यासपीठ एलॉन मस्क यांना विकण्याचा विचार करत आहे. चीनी अधिकाऱ्यांची प्राथमिकता टिकटॉक ला ByteDance च्या नियंत्रणाखाली ठेवण्याची आहे. मात्र, अमेरिकेत टिकटॉकवर बंदी लावण्यात आल्यास एलॉन मस्क यांच्यासोबत व्यवहार होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
TikTok वर बंदीची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी 2025 नंतर अमेरिकेत टिकटॉक वर बंदी लागू करण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने संघीय कायद्याला पाठिंबा दिल्यानंतर ही बंदी अटळ झाली आहे. या निर्णयामुळे ByteDance ला टिकटॉक चे अमेरिकेतील संचालन थांबवावे लागेल. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीनविरोधी धोरणामुळे टिकटॉक वर बंदी लादण्याचे राजकीय व आर्थिक महत्त्व अधिक स्पष्ट झाले आहे.
एलॉन मस्क आणि ट्रम्प यांचे संबंध
एलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आहे. एलॉन मस्क यांनी 2024 च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प ला, रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा दिला होता. ट्रम्प प्रशासनाच्या नवगठित “DOGE” विभागाचे सह-अध्यक्ष म्हणून मस्क यांची नियुक्ती झाली आहे. यामुळे टिकटॉक खरेदीसाठी त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.
इतर कंपन्यांना फायदा?
याशिवाय, टिकटॉक वरील बंदीमुळे Instagram (Meta) आणि YouTube (Alphabet) यांसारख्या अमेरिकी कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो. टिकटॉक च्या अनुपस्थितीत या व्यासपीठांना अधिक युजर्स व व्ह्यूज मिळू शकतात. शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मसाठी स्पर्धा वाढणार असून, अमेरिकन कंपन्यांना वर्चस्व मिळवण्याची मोठी संधी असेल.
एलॉन मस्क यांची वाढती रुची
ट्विटर खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क यांनी त्याला X म्हणून रीब्रँड केले. जर एलॉन मस्क यांनी टिकटॉक खरेदी केल्यास हे सोशल मीडिया क्षेत्रातील त्यांचे स्थान अधिक बळकट करेल. SpaceX आणि Tesla यांसारख्या यशस्वी ब्रँड्सचे नेतृत्व करणाऱ्या मस्क यांची TikTok खरेदी डिजिटल जगतात मोठा बदल घडवू शकते. टिकटॉकच्या अमेरिकेतील भवितव्याबाबत मोठी अनिश्चितता आहे. बंदीमुळे अमेरिकेतील सोशल मीडिया क्षेत्रात नवा अध्याय सुरू होऊ शकतो. एलन मस्क यांची टिकटॉक खरेदी हा तंत्रज्ञान व डिजिटल जगातील क्रांतिकारक निर्णय ठरू शकतो.