Erdogan again offered to mediate on Kashmir India firmly called it an internal matter
Turkey On Kashmir : तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी पुन्हा एकदा काश्मीर मुद्यावर भाष्य करत मध्यस्थीची ऑफर दिली असून, त्यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया देत हे विधान फेटाळून लावले आहे. एर्दोगान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी १७ मे रोजी झालेल्या चर्चेत हे वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, तुर्की “दोन्ही देशांमध्ये संतुलन राखून” आणि “मानवी हक्कांवर आधारित उपाय सुचवून” मदत करू इच्छिते. मात्र भारताने पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले आहे की काश्मीर हा देशाचा अंतर्गत मुद्दा आहे आणि कोणत्याही तिसऱ्या पक्षाची हस्तक्षेपाची गरज नाही. तुर्कीच्या या भूमिकेला भारताने सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा प्रयत्न मानले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की “दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत”. भारताच्या मते, आता पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा होणार असल्यास ती फक्त दोन मुद्द्यांवर मर्यादित राहील.
1. पाकपुरस्कृत दहशतवादाचा अंत
2. पाकव्याप्त काश्मीरचा भारतात विलय
याशिवाय कोणत्याही मुद्यावर तिसऱ्या देशाची भूमिका भारत मान्य करणार नाही. त्यामुळे एर्दोगान यांची मध्यस्थीची भूमिका भारतासाठी ग्राह्य नाही.
तुर्की आणि पाकिस्तानमधील मैत्रीपूर्ण संबंध काही लपलेले नाहीत. अलीकडे तुर्कीने पाकिस्तानला अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रे पुरवली, जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारताविरुद्ध वापरली जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतातील जनतेमध्ये तुर्की विरोधात नाराजी वाढत आहे, आणि तुर्की उत्पादनांवर बहिष्काराची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे, 2023 च्या भूकंपावेळी भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत सर्वप्रथम मदत पोहोचवली होती, पण त्यानंतरही तुर्कीने भारताच्या विरुद्ध भूमिका घेतल्याचे दिसते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘N’ शब्दाने नवा वाद! भारत-पाकिस्तान ‘युद्धबंदीत’ ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाचा दावा पुन्हा एकदा चर्चेत
एर्दोगान यांनी चर्चेनंतर दिलेल्या निवेदनात सांगितले की, “आम्ही काश्मीरवर सविस्तर चर्चा केली आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून तोडगा शोधण्याची इच्छा व्यक्त केली.” भारताने हे विधान पूर्णपणे फेटाळून लावत स्पष्ट केले की, काश्मीर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा आहे, आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची आवश्यकता नाही. भारताच्या दृष्टीने हे विधान देशाच्या सार्वभौमत्वावर आघात करणारे असून, यावर भारताने पूर्वीप्रमाणेच कठोर प्रतिक्रिया दिली आहे.
एर्दोगान यांचे काश्मीरबद्दल वक्तव्य करणे ही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यावर भारताने तीव्र शब्दात निषेध केला होता. भारताने तुर्कीला सांगितले होते की त्यांनी आपल्या देशातील कुर्द प्रश्न, मानवी हक्कांचे उल्लंघन, माध्यम स्वातंत्र्याचा अभाव या गंभीर मुद्द्यांकडे लक्ष द्यावे आणि इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘अवकाशातून माहिती, जमिनीवर प्रहार…’ Operation Sindoor मध्ये शत्रू सैन्यावर भारी पडले ISROचे ‘हे’ 10 बाहुबली
तुर्कीने पुन्हा एकदा काश्मीरबाबत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याने भारताने अत्यंत स्पष्ट आणि तीव्र भूमिका घेतली आहे. भारतासाठी काश्मीर हा अखंड आणि अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोणतीही मध्यस्थी किंवा तिसऱ्या पक्षाची चर्चा भारताला मान्य नाही. एर्दोगान यांच्या वक्तव्यांमुळे भारत-तुर्की संबंधांत तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि युरोपीय तसेच इस्लामी राष्ट्रांच्या पातळीवर भारत याविरोधात राजनैतिक पावले उचलू शकतो, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.