'दहशतवादी हल्ले झाले तर योग्य प्रत्युत्तर देणार'; जयशंकर यांचा अमेरिकेतून पाकिस्तानला इशारा
Jaishankar Pakistan terrorism : अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर सध्या युरोप दौर्यावर असून, जागतिक राजकारणाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या व्यापार युद्धापासून ते पाकिस्तानमधील दहशतवाद, युक्रेन आणि गाझा युद्ध, तसेच जगातील बदलती सत्ता रचना यावर तीव्र भाष्य करत “जग सध्या अत्यंत अस्थिरतेच्या कालखंडातून जात आहे,” असे स्पष्टपणे म्हटले आहे.
नेदरलँड्समधील एका प्रमुख मुलाखतीत जयशंकर म्हणाले, “सध्या जग संकटात आहे. अनेक मोर्चांवर संघर्ष सुरू आहेत. युक्रेनमध्ये रशियाविरुद्धचे युद्ध, गाझामध्ये मानवी संकट, चीनचा तैवानवरचा दबाव आणि भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव.” त्यांनी यासोबतच म्हटले, “या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जागतिक सत्ता समतोल पुन्हा एकदा घडवला जात आहे. आजचे जग पूर्वीइतके पाश्चात्यप्रधान नाही, हे अधिक बहुध्रुवीय आणि विविधतेने भरलेले बनत चालले आहे. विशेषतः आशियाचा प्रभाव वाढत आहे आणि भारत हे या नव्या घडामोडींचे केंद्रबिंदू ठरत आहे.”
जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “अमेरिकेने जागतिक व्यापार युद्धाची सुरूवात केली आहे, ज्यामुळे जगभरातील आर्थिक असंतुलन वाढले आहे. संरक्षणवाद, व्यापार निर्बंध आणि आर्थिक तणाव यामुळे विकसनशील देशांवर अतिरिक्त दबाव निर्माण होत आहे.” त्यांचे हे विधान चीन, भारत आणि अन्य आशियाई देशांवर अमेरिकेच्या व्यापार धोरणांचा होणारा परिणाम अधोरेखित करते. जागतिक व्यापारात अमेरिकेच्या वर्चस्ववादी धोरणांची टीका करताना जयशंकर यांनी बहुपक्षीय आणि न्याय्य व्यापार यंत्रणांचा आग्रह धरला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Make in India’चा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश; रशियाची भारतासोबत ‘AK-203 असॉल्ट’ रायफल्सबाबत मोठी घोषणा
दुसऱ्या एका संवादादरम्यान, जयशंकर यांना विचारण्यात आले की, त्यांनी पाकिस्तानला दहशतवादाचे केंद्र म्हटले होते का? यावर त्यांनी ठामपणे उत्तर दिले, “हो, मी हे पूर्वीही म्हटले आहे आणि अजूनही त्यावर ठाम आहे. पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांना तिथल्या सरकारचा स्पष्टपणे पाठिंबा आहे.” ते पुढे म्हणाले, “कल्पना करा की अॅमस्टरडॅमसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात हजारो लोक लष्करी प्रशिक्षण घेत असतील, आणि सरकार म्हणत असेल की त्यांना काही माहिती नाही – हे शक्य नाही. हे सांगणे म्हणजे जगाच्या डोळ्यांत धूळफेक करणे आहे.”
जयशंकर यांनी भारताने राबवलेल्या “ऑपरेशन सिंदूर” चेही उदाहरण दिले, जे दहशतवादाविरोधात भारताच्या आक्रमक आणि निर्णायक भूमिकेचे द्योतक आहे. त्यांनी सांगितले की, “भारत दहशतवादाविरोधात कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही, आणि आमची लढाई सीमांच्या पलिकडेही असेल.”
जयशंकर यांच्या वक्तव्याने एक बाब स्पष्ट होते. भारत आता जागतिक घडामोडींमध्ये फक्त सहभागी नाही, तर प्रभावी भूमिका बजावत आहे. जागतिक सत्ता समतोलात भारताचा आवाज अधिक स्पष्ट आणि ठाम होत चालला आहे. त्यांनी दिलेल्या संकेतांनुसार, भारत हा नव्या जागतिक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. जो अशांततेच्या काळातही स्थिरतेचा, समानतेचा आणि विकासाचा आवाज बुलंद करतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जग अंधारात बुडणार? भयानक सौर वादळ सरकत आहे पृथ्वीच्या दिशेने; भोगावे लागणार गंभीर परिणाम
डॉ. एस. जयशंकर यांनी युरोप दौऱ्यातून जागतिक शक्तींना स्पष्ट संदेश दिला आहे. भारत ही केवळ आशियाई शक्ती नसून, एका नव्या बहुध्रुवीय जागतिक रचनेचा सक्रिय चालक आहे. व्यापार, सुरक्षा आणि समतोल यांमध्ये भारताची भूमिका वाढणार हे स्पष्ट झाले आहे.