'Father Of Nutella' Francesco Rivella passes away at the age of 97
फ्रान्सेस्को रिवेला, ज्यांना ‘Father Of Nutella’ म्हणून ओळखले जाते, यांचे वयाच्या 97 व्या वर्षी व्हॅलेंटाइन डे (१४ फेब्रुवारी) रोजी निधन झाले. प्रसिद्ध हेजलनट स्प्रेड नुटेला तयार केल्याबद्दल जगभरात प्रसिद्ध होते. फ्रान्सेस्को रिवेला यांनी 1952 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी ब्रोमॅटोलॉजिकल केमिस्ट्री मध्ये ट्युरिनमध्ये पदवी मिळवल्यानंतर इटालियन चॉकलेट आणि कन्फेक्शनरी कंपनीत काम करण्यास सुरुवात केली.
फ्रान्सेस्को रिवेला यांची कारकीर्द
नुटेला बाजारात येण्याच्या बारा वर्ष आधीपासूनच त्यांनी या क्षेत्रात आपली कारकीर्द घडवायला सुरुवात केली. मीडिया रिपोर्टनुसार, रिवेला फेररो कंपनीच्या “केमिस्ट्री रूम” मध्ये काम करत होते, जिथे कंपनीच्या अनेक प्रसिद्ध उत्पादनांचा शोध लावण्यात आला. त्यांना नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी कच्च्या मालाचे अभ्यास करण्याचे काम देण्यात आले होते. चव आणि घटकांचे योग्य प्रमाण साधण्यासाठी मिश्रण करणे, परिक्षण करणे आणि चाखून पाहणे या कामात ते तरबेज होते.
फेररोचे व्यवस्थापक
रिवेला फेररोचे वरिष्ठ व्यवस्थापक झाले आणि संस्थापक पिएर फेररो यांचे पुत्र मिशेल फेररो यांच्यासोबत काम केले. 1946 मध्ये विकल्या गेलेल्या चॉकलेट-हेजलनटच्या मिठाईचा प्रकार जिआंडुजोट पेस्टला त्यांनी डेव्हलप केले. या गोड पेस्टला ब्रेडवर लावण्यासाठी लोफच्या स्वरूपात साचवले जात असे.
नुटेला ची निर्मिती
1951 मध्ये या पेस्टचे नाव बदलून सुपरक्रीमा ठेवण्यात आले. 1964 मध्ये हेजलनट आणि कोको क्रीमची निर्मिती झाली आणि याला नुटेला नाव देण्यात आले. पुढे 1965 मध्ये जर्मनीत आणि 1966 मध्ये फ्रान्समध्ये हे उत्पादन लाँच करण्यात आले. सध्या हे भारतासह अनेक देशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
नुटेला इतके लोकप्रिय झाले की 5 फेब्रुवारी हा दिवस “वर्ल्ड नुटेला डे” म्हणून साजरा केला जातो. इटालियन-अमेरिकन ब्लॉगर सारा रॉसो यांनी हा दिवस घोषित केला होता. नुटेला साखर, पाम तेल, हेजलनट्स, दूध, कोको, लेसिथिन आणि व्हॅनिलिन या सात घटकांपासून बनलेले आहे.
उर्वरित आयुष्य
निवृत्तीनंतर रिवेला यांनी फळबागेची काळजी घेण्यास आणि पारंपरिक इटालियन खेळ पल्लापुग्नोमध्ये आपली उर्वरित वेळ घालवला. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी आणि सात नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे अंतिम संस्कार अल्बा येथे सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.