Floods wreak havoc in Texas, USA, More than 100 people dead, many missing
वॉशिंग्टन : सध्या अमेरिकेत मोठा गोंधळ सुरु आहे. एकीकडे हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये पुराने थैमान मांडले आहे. यामुळे १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण बेपत्ता झाले आहे. यामध्ये शाळकरी मुलींचाही समावेश आहे. या प्रचंड विनाशाकारी पुराने सध्या टेक्सासमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूरग्रस्त भागांना भेट देणार असल्याचे म्हटले आहे. टेक्सासमध्ये पुरामुळे टेक्सासच्या हिल कंट्रीमधील उन्हाळी शिबिर कॅम्प मिस्टिकच्या पुरात २७ जणांचा मृत्यू झाल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. तसेच इतर ११ कॅम्पर्सही बेपत्ता असल्याची माहिती शिबिराच्या आयोजकांनी दिली आहे. आतापर्यंत ८४ लोकांचे मृतदेह सापडले आहे.
शुक्रवारी (४ जुलै) रोजी मुसळधार पावसामुळे अमेरिकेच्या ग्वाडालुपे नदीच्या पाण्याची पातळी वाढली. अवघ्या ४५ मिनिटांत सुमारे २६ फूटाने नदीची पातळी वाढल्याने टेक्सासच्या हिल कंट्रीमध्ये भीषण पूर आला. यामुळे प्रचंड विनाश झाला आहे. सध्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेन दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत दरवर्षी पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. गेल्या वर्षी पुरामुळे सरासरी १२५ लोकांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये हेलेन चक्रीवादळाने देखील हाहाकार माजवला होता. या वादाळामुळे अमेरिकेच्या फ्लोरिडा, जॉर्जिया, कॅरोलिनास, टेनेसी आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता. यामध्ये जवळपास २५० लोकांचा मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये देखील केंटकी राज्यात पुरामुळे ४५ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ऑगस्ट २०२१ मध्ये वेवरील, टेनेसीमध्ये पुरामुळे २० जणांचा मृत्यू झाला होता.
टेक्सासच्या गव्हर्नर ग्रेन ॲबॉट यांनी पूरस्थितीमुळे आपत्कालीन स्थितीचा इशारा कायम दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी आमची टीम सतत प्रयत्न करत आहे. ही मोहीम २४ तास सुरु राहिल असे त्यांनी म्हटले आहे. टेक्सासच्या सॅन ॲंटोनियाच्या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावासातही अनेक बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.सध्या पुरामुळे टेक्सासमध्ये नाले आणि जलवाहिन्या भरुन पाणी रस्त्यावर वाहत आहे. सॅन ॲंटोनियाचे बचाव पथक हेलिकॉप्ट आणि ड्रोन्सच्या मदतीने लोकांचा शोध घेतला जात आहे.