Gaza War 20,000 flee overnight amid Israeli threats roads jammed
इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये एका रात्रीत तब्बल २० हजार पॅलेस्टिनींनी देश सोडला.
रस्त्यांवर वाहतूक कोंडी, मृत्यू आणि स्थलांतर यामुळे गाझा नरकयातनागृहासारखा झाला आहे.
कतारमध्ये मुस्लिम देशांची शिखर परिषद सुरू असली तरी इस्रायल कोणत्याही दबावाखाली झुकण्यास तयार नाही.
Israel Gaza War update : मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून गाझा पुन्हा एकदा युद्धाच्या गर्तेत ओढला गेला आहे. इस्रायलच्या अविरत हल्ल्यांमुळे नागरिकांचे जगणेच अवघड झाले आहे. एका रात्रीत तब्बल २० हजार पॅलेस्टिनींना आपले घरदार सोडून पलायन करावे लागले. रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी, मृत्यूचे वाढते प्रमाण आणि सर्वत्र पसरलेली भीती यामुळे गाझाचे वातावरण अक्षरशः थरारक झाले आहे.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, गाझामध्ये राहणाऱ्या लोकांवर सतत इस्रायली हल्ल्यांची भीती दाटून आली आहे. काही नागरिक आपले सामान गाड्यांमध्ये भरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर अनेकांना गाडीचीही सोय नसल्याने ते पायी चालत गाझा सोडत आहेत. काल रात्रीच्या मोठ्या स्थलांतरामुळे गाझाच्या रस्त्यांवर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. त्याच वेळी इस्रायली सैन्याने केलेल्या जोरदार हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूंनी गाझाच्या लोकांची भीती आणखीनच वाढवली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump News : शांतीदूत बनण्याचे नाटक करून ट्रम्प स्वतःच युद्धाच्या तयारीत व्यस्त; ‘या’ देशावर करणार हल्ला?
हमास आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी होण्याची सध्या काहीही शक्यता नाही. उलट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सार्वजनिकपणे जाहीर केले आहे की, “गाझामध्ये लपलेल्या प्रत्येक दहशतवाद्याचा नायनाट झाल्याशिवाय ते थांबणार नाहीत.” गेल्या आठवड्यात त्यांनी गाझातील रहिवाशांना ठाम इशारा दिला होता की, “लवकरच हे क्षेत्र सोडा.” या घोषणेमुळे नागरिकांच्या मनातील दहशत प्रचंड वाढली आहे.
एकीकडे, कतारमध्ये ५० मुस्लिम देशांची शिखर परिषद सुरू आहे. या बैठकीत सर्व मुस्लिम राष्ट्रांनी एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला असला तरी इस्रायलवर त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. उलट, कतारवर झालेल्या इस्रायली हल्ल्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली आहे. आंतरराष्ट्रीय दबाव असूनही इस्रायल आपले हल्ले सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.
गाझामध्ये सध्या १० लाखांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिक राहतात. त्यापैकी लाखो लोक आतापर्यंत देश सोडून गेले आहेत. इस्रायलने रहिवाशांना दक्षिणेकडील भागात आश्रय घेण्याचा सल्ला दिला असला तरी नागरिकांना आता कोणतेही ठिकाण सुरक्षित वाटत नाही. वेस्ट बँकसारख्या तुलनेने शांत भागातही इस्रायलचे हल्ले सुरू झाल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक झाली आहे. तुबास, नाब्लस आणि वेस्ट बँकच्या उत्तरेकडील भागात हवाई हल्ले सुरू असल्याचे वृत्त आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vision2030 : दीर्घायुष्याचा सौदी फॉर्म्युला! जाणून घ्या ‘या’ देशाने कसे पोहोचवले नागरिकांचे आयुर्मान 46 वरून 79 वर
गाझाचे लोक आज पूर्णतः निराश झाले आहेत. अन्नधान्य, पाणी आणि आरोग्यसेवेची कमतरता त्यांना जगणे कठीण करत आहे. प्रत्येक घरातून फक्त एकच आवाज येतो “आम्हाला जगायचं आहे, पण कुठे?” लहान मुले, वृद्ध, महिला हे सर्वजण भीतीच्या छायेत आयुष्य कंठत आहेत. एकीकडे युद्ध, दुसरीकडे पलायन; यातून सुटकेचा कोणताही मार्ग त्यांना सापडत नाही. गाझामध्ये घडणाऱ्या या घटनांनी पुन्हा एकदा युद्धाच्या क्रौर्याची जाणीव करून दिली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने कितीही शांततेची हाक दिली तरी जमिनीवर परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भीती, मृत्यू आणि पलायन हीच गाझावासियांची खरी कहाणी बनली आहे. मध्यपूर्वेतील हा तणाव आता जागतिक शांततेलाही गंभीर आव्हान ठरत आहे.