Global outcry after Pahalgam attack UN chief calls Jaishankar Pakistan worried
Pahalgam terror attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी थेट भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत शांतता व स्थैर्य टिकवण्याचे आवाहन केले आहे.
पहलगाम येथील या हल्ल्यात नागरिकांचे आणि जवानांचे प्राण गेले असून, संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांनी एस. जयशंकर यांना फोन करून या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “दहशतवादाला कोणतीही जागा नाही. अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.”
या फोनबाबत एस. जयशंकर यांनी स्वतः इन्स्टाग्राम पोस्टमध्ये माहिती दिली. त्यांनी लिहिले, “संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचा फोन आला. त्यांनी पहलगाममधील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आणि जबाबदारी निश्चित होणे गरजेचे असल्याचे मत मांडले. त्यांच्या भावना आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताकडून हल्ल्याची भीती; पाकिस्तानची लष्करी हालचाल वाढली, हवाई दल सतर्क, सीमा सुरक्षा बळकट
दरम्यान, पाकिस्तानमध्ये या घटनेनंतर युद्धाची भीती वाढली आहे. देशातील अनेक वृत्तवाहिन्यांनी दावा केला आहे की भारताकडून लवकरच कठोर प्रत्युत्तर मिळू शकते. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत गुटेरेस यांच्याशी झालेल्या संवादाची माहिती दिली. शाहबाज म्हणाले, “भारताकडून पाकिस्तानवर लावले जाणारे आरोप निराधार आहेत. आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने राहिलो आहोत. महासचिव गुटेरेस यांनी दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.” पाकिस्तानने या विषयावर रशिया, तुर्की यांच्यासह इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार आणि लष्कर देखील सतर्क अवस्थेत आहेत.
गुटेरेस यांनी दोन्ही देशांना स्पष्टपणे संदेश दिला आहे की, अशा प्रकारच्या घटनांचा आंतरराष्ट्रीय चौकशीतून निकाल लागावा, आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई व्हावी. त्यांच्या मते, अशा घटकांमुळे दक्षिण आशियात तणाव वाढू शकतो, जो केवळ भारत आणि पाकिस्तानसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी धोका ठरू शकतो. त्यांनी हेही स्पष्ट केले की, कुठल्याही प्रकारचा युद्धजन्य निर्णय टाळावा आणि शांततेच्या दिशेने पावले उचलावीत.
भारताने आधीच या हल्ल्याबाबत पाकिस्तानला दोषी धरले असून, पाक पुरस्कृत दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले आहे. भारताची भूमिका ठाम आहे की, दहशतवाद आणि शांततेचा एकत्र अस्तित्व असू शकत नाही. पाकिस्तान मात्र बचावात्मक भूमिकेत असून, तो सर्व आरोप फेटाळत आहे. परंतु, गुटेरेस यांचा या मुद्द्यावर हस्तक्षेप आणि दोन्ही देशांशी संपर्क साधणे, हे दर्शवते की जागतिक समुदाय या घटनेला गंभीरतेने घेत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताकडून हल्ल्याची भीती; पाकिस्तानची लष्करी हालचाल वाढली, हवाई दल सतर्क, सीमा सुरक्षा बळकट
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढताना दिसत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांचे महासचिव गुटेरेस यांच्या मध्यस्थीमुळे कूटनीतिक संवादाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युद्ध नको, जबाबदारी हवी – असा संतुलित संदेश गुटेरेस यांनी दोन्ही देशांना दिला असून, या प्रकरणाची न्याय्य चौकशी आणि दहशतवादाविरुद्ध संयुक्त कारवाई हीच जागतिक अपेक्षा असल्याचे स्पष्ट केले आहे.