Global Technology Summit 2025 Talks for trade deal with US underway at full speed Jaishankar
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी कार्नेगी इंडिया आयोजित ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट (GTS) 2025 मध्ये सहभाग घेतला. या शिखर परिषदेत त्यांनी भारत-अमेरिका संबंध, तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल, तसेच अमेरिका-चीन तणावावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या सत्रानंतर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल देखील या परिषदेचे संबोधन करणार आहेत. ही परिषद भारताच्या भू-तंत्रज्ञान धोरणांवरील चर्चेसाठी सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ मानली जाते. परराष्ट्र मंत्रालय आणि कार्नेगी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत जगभरातील तंत्रज्ञान धोरणांवर मंथन करण्यात आले.
भारत आणि अमेरिकेमधील व्यापार कराराबद्दल जयशंकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “अमेरिकेत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एका महिन्यातच आम्ही परस्पर व्यापार करारासाठी चर्चा सुरू केली आहे. आम्हाला असा करार हवा आहे जो दोन्ही देशांसाठी फायदेशीर आणि दीर्घकालीन यशस्वी ठरेल.” पूर्वीच्या चर्चांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही, यावर बोलताना ते म्हणाले, “या आधी चार वर्षे चर्चांची प्रक्रिया सुरू होती, मात्र कोणताही ठोस करार शक्य झाला नाही. मात्र, यावेळी आम्ही पूर्ण गांभीर्याने आणि वेगाने काम करत आहोत. आता चर्चा लांबवण्याचा प्रश्नच येत नाही.”
व्यवसाय संघाच्या सक्रियतेबद्दल सांगताना ते म्हणाले, “यावेळी आम्हाला एक मोठी संधी मिळाली आहे आणि आम्ही ती वाया घालवू इच्छित नाही. आमचा व्यवसाय संघ अत्यंत सक्रिय आहे आणि चर्चेचा वेगही लक्षणीय आहे. पूर्वी आम्हाला चर्चेचा वेग कमी असल्याचे सांगितले जात होते, पण आता आम्हीच ती पुढे नेण्यास प्राधान्य देत आहोत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Ram Mandir: पाकिस्तानात बांधले जात आहे भव्य राम मंदिर! भारतातून आणली जाणार ‘ही’ खास वस्तू
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी युरोपमधील बदलत्या स्थितीवर भाष्य करताना महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी युरोपची स्थिती तुलनेने स्थिर आणि संतुलित होती. त्यांनी अमेरिका, रशिया आणि चीनसोबत योग्य तोडगा काढला होता, पण आता परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. या तीनही देशांमध्ये तणाव वाढला आहे, ज्याचा परिणाम युरोपवरही झाला आहे.” युरोपच्या कठीण परिस्थितीत तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा वाटा आहे, असे नमूद करत ते म्हणाले, “कधीकधी जेंव्हा आपण विविध बाजूंनी धोरणात्मक हालचाली करतो, तेव्हा त्याचा अल्पकालीन फायदा होतो. पण दीर्घकाळासाठी मात्र त्याचे परिणाम गुंतागुंतीचे आणि कठीण ठरू शकतात.”
अमेरिकेच्या बदलत्या धोरणांवर प्रकाश टाकताना जयशंकर म्हणाले, “अमेरिकेने आता जगाशी संबंध ठेवण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केले आहेत. याचा परिणाम सर्व क्षेत्रांमध्ये दिसून येत आहे आणि भविष्यात ते आणखी ठळक होतील.” तंत्रज्ञान क्षेत्रातील परिणामांविषयी त्यांनी सांगितले, “या बदलांचा सर्वात मोठा परिणाम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होईल. याचे कारण एवढेच नाही की अमेरिका सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे, तर अमेरिका स्वतःला तंत्रज्ञानाच्या जोरावर आणखी मजबूत करण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.”
चीनच्या तंत्रज्ञान प्रगतीवर भाष्य करताना जयशंकर म्हणाले, “गेल्या एका वर्षात अमेरिकेत मोठे बदल झाले आहेत आणि जग त्याची दखल घेत आहे. त्याचप्रमाणे, आणखी एक बदल हळूहळू घडत आहे आणि तो म्हणजे चीनची वेगाने होणारी तांत्रिक प्रगती.”
चीनच्या घोडदौडीबद्दल बोलताना ते म्हणाले, “हा अचानक झालेला बदल नाही, तर हळूहळू घडत असलेली प्रक्रिया आहे. व्यापार हा तंत्रज्ञानाशी जोडलेला आहे, आणि त्यात काही मोठे टप्पे आले आहेत, जसे की ‘डीप सीक’. मला वाटते की चीनमुळे होत असलेल्या बदलांचा अमेरिकेमुळे होत असलेल्या बदलांइतकाच खोलवर परिणाम होतो आणि याचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडतो.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनमध्ये योगाचा वाढता प्रभाव; प्राध्यापक वांग झी चेंग यांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
ग्लोबल टेक्नॉलॉजी समिटमध्ये जयशंकर यांनी मांडलेले विचार जागतिक राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. भारत-अमेरिका व्यापार कराराला गती मिळत असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले, तसेच युरोपमधील अस्थिरता आणि अमेरिका-चीन तणावाचा भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो, यावरही भाष्य केले. तंत्रज्ञान हे केवळ अर्थव्यवस्थेचा भाग नसून जागतिक शक्तिसंतुलन ठरवणारा एक महत्त्वाचा घटक आहे, याचा पुनरुच्चार करत जयशंकर यांनी भारताच्या भूमिकेची स्पष्ट मांडणी केली. यामुळे भारताने तंत्रज्ञान आणि व्यापार क्षेत्रात अधिक आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला.