greater india pakistan china unity pakistan peoples view
India Pakistan China geopolitics : पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे पंजाब व खैबर पख्तूनख्वा या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. घरे उद्ध्वस्त झाली, शेकडो कुटुंबं बेघर झाली. मात्र या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या जनतेने आपल्या सरकारवरच गंभीर आरोप केले आहेत. “पुरनियंत्रणासाठी किंवा आपत्कालीन मदतीसाठी येणाऱ्या पैशांपैकी केवळ ३० टक्के जनता वापरू शकते, तर उर्वरित ७० टक्के भ्रष्टाचाराच्या खाईत जातो,” असा सरळ आरोप लोकांनी केला.
यूट्यूबर सोहेब चौधरी यांनी प्रभावित भागांमध्ये लोकांशी संवाद साधला असता, तेथील नागरिकांनी सरकारसोबतच भारतावरही रोष व्यक्त केला. लोकांचे म्हणणे आहे की, भारत धरणांमधील पाणी साठवून ठेवतो आणि गरजेप्रमाणे सोडतो. यामुळे दरवर्षी पाकिस्तानात पूरस्थिती उद्भवते. काहींनी तर थेट आरोप केला की, भारताने जाणूनबुजून पाकिस्तानकडे पाणी सोडले.
लोकांनी चर्चेत आणलेला मुख्य मुद्दा म्हणजे सिंधू पाणी करार. १९६० मध्ये झालेल्या या करारानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब नद्या पाकिस्तानकडे, तर सतलज, रावी आणि बियास नद्या भारताकडे आहेत. भारताला केवळ २०% पाणी वापरण्याचा अधिकार आहे, तर पाकिस्तान ८०% पाणी वापरतो. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने करार स्थगित केल्याचा दाखला देत लोक म्हणतात की, “भारत आधी पाणी थांबवतो, मग अचानक सोडतो, हे सगळं तो स्वतःच्या फायद्यासाठी करतो.” काही नागरिकांनी असेही सांगितले की, “जर चीनने भारताकडे पाणी सोडले, तर भारत ते आपल्या दिशेने वळवून ठेवेल आणि गरजेप्रमाणे सोडेल. हा सगळा खेळ आमच्या सरकारच्या दुर्लक्षामुळेच आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India US trade talks : आता सरकार ट्रम्पपासून सावध आहे; भारत अमेरिकेसोबतच्या व्यापार चर्चेत आपल्या निर्णयांवर ठाम
पाकिस्तानी नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, सामान्य स्तरावर भारत-पाकिस्तान यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. मात्र सरकारमुळे संबंध सुधारत नाहीत. भारतावर अखंड भारताचा अजेंडा राबवण्याचा आरोप करत लोक म्हणाले की, “जसे इस्रायलला ग्रेटर इस्रायल हवे आहे, तसेच भारत अखंड भारताची स्वप्ने पाहतो. त्यामुळे तो खरा शत्रू आहे.”
पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांमध्ये लोकांचा रोष केवळ भारतावरच नाही तर आपल्या सरकारवरही अधिक आहे. एक नागरिक म्हणाला, “भारतामध्ये ३६ राज्यं आहेत, आमच्याकडे फक्त चार. तरीही आमची सात गावे पाण्यात बुडाली. सरकारकडे ना योजना, ना तयारी. ते फक्त मदतीचे पैसे खाण्यात व्यस्त आहेत. एनजीओच्या नावाखाली भ्रष्टाचार होतो. निधी येतो, पण त्यातील ७०% अधिकारी आणि राजकारणी गिळतात.” काहींनी विकास प्रकल्पांबाबतही नाराजी व्यक्त केली. “आम्हाला वीज, पाणी, शिक्षण यांची गरज होती. पण सरकारने मेट्रो बांधली. तिकीट २० रुपयांचे आणि कर ४० रुपयांचा. लोकांची परिस्थिती बिकट असताना लाखो रुपये प्रकल्पांवर वाया घालवले. कपडे फाटले आहेत, पण लोकांना जबरदस्तीने १० हजारांचे बूट विकले जात आहेत. सरकारला फक्त भ्रष्टाचाराची भूक आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 40 लाख फोनवर पाळत,चिनी तंत्रज्ञान, परदेशी कंपन्यांची मदत; पाकिस्तानमध्ये शाहबाज सरकारची नागरिकांवर करडी नजर
पूरासारख्या नैसर्गिक संकटाच्या वेळी सरकारने मदत करायला हवी होती, पण पाकिस्तानातील लोकांच्या आरोपांनुसार निधीचा मोठा भाग भ्रष्टाचाराच्या खाईत जातोय. भारताबाबतही तक्रारी आणि संशय कायम आहेत. मात्र पाकिस्तानच्या जनतेचा खरा आक्रोश आपल्या नेत्यांविरुद्ध आहे. ज्यांनी संकटाला संधी बनवून स्वतःची तिजोरी भरली.