Paikistan Flood: पावसाने पाकिस्तानला धू-धू धुतले; २६६ नागरिकांचा मृत्यू तर ६०० पेक्षा जास्त...
Pakistan Rain Update: पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाने पाकिस्तानमध्ये दाणादाण उडाली आहे. पाकिस्तानच्या अनेक भागात महापूर आला आहे. जनजीवन विस्कळीत आहे. आतापर्यंत २६ वेगवेगळ्या घटनांमध्ये २२६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२६ मुलांचा समावेश देखील आहे. तर ६२८ नागरिक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांमध्ये १४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, १७ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तान राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाच्या माहितीनुसार, पंजाब प्रांतात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. पंजाब प्रांतात १४४ मृत्यू झाले आहेत. याशिवाय सिंधू भागात २५, बलुचिस्तान १६ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये १० आणि इस्लामाबादमध्ये ८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसांत २४६ घरांचे नुकसान झाले आहे. तर ३८ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद, पाकव्याप्त काश्मीर, बलुचिस्तान भागात जोरदार पाऊस सुरु आहे.
पाकिस्तानमध्ये पावसाळा सुरु झाल्यापासून १,२५० घरांचे नुकसान झाले आहे. तर ३६६ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तरबेला धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सिंधू नदी दुथडी भरून वाहत आहे. ज्यामुळे अटक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरु आहे. रावळपिंडी, इस्लामाबाद, पंजाब प्रांत, बलुचिस्तान या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे, सखल भागात पाणी साचले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट भागात पावसाचा जोर कायम आहे. तिथे अचानक आलेल्या पुरामुळे ८ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १० पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पाकिस्तान राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, पूरस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे. अनेक ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे, अनेक धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आला आहे. सखल भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी अचानक पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरांचे आणि सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारतर्फे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य सुरु करण्यात आलं आहे.