'इस्रायलशी तडजोड करण्यास तयार, पण अटींसह'; हिजबुल्लाहचा नवा प्रमुख कासिम यांचे पहिल्या भाषणात मोठे वक्तव्य
नवी दिल्ली: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख नेता हसन नसराल्लाह ठार झाल्यानंतर, संघटनेने हिजबुल्लाहचा नवीन उत्तराधिकारी म्हणून उपसचिव नईम कासिम यांची निवड केली. हिजबुल्लाचा नवा प्रमुख नाईम कासिम यांनी आपल्या नियुक्तीच्या दुसऱ्या दिवशी पहिले भाषण दिले. नाईम कासिम यांनी लेबनॉनमधील हिजबुल्ला संघटनेच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली.
माजी हिजबुल्ला प्रमुख सय्यद हसन नसरल्लाह यांच्या मार्गावर चालण्याचा निर्धार
यानंतर एका भाषणात नईम कासिम यांनी इस्रायलशी युद्धविरामास तयार असल्याचे सांगितले, मात्र इस्त्रायलला काही अटी मान्य कराव्या लागतील असे त्यांनी म्हटले. यादरम्यान, कासिम यांनी माजी हिजबुल्ला प्रमुख सय्यद हसन नसरल्लाह यांच्या मार्गावर चालण्याचा निर्धार व्यक्त केला. हसन नसरल्लाह 27 सप्टेंबरला झालेल्या इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता.
नईम कासिम यांनी म्हटले की, “माझे कार्य, हसन नसराल्लाह यांच्या मार्गाव चालण्याचे आहे, त्यांचे अपूर्ण राहिलेले काम आम्ही पूर्ण करू” असे कासिम यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी इस्रायलवर लेबनॉनविरुद्ध “39,000 उल्लंघन” केल्याचा आरोप केला. याशिवाय, इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये वसाहती स्थापण्याचा कट रचल्याचाही आरोप त्यांनी केला.
हे देखील वाचा- Israel-Hezbollah War: हिजबुल्लाने निवडला नवा प्रमुख; कोण आहे नईम कासिम? जाणून घ्या
अमेरिका आणि युरोपियन युनियनवरही टीका
कासिम यांनी अमेरिका आणि युरोपियन युनियनवरही टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले की, या देशांनी गाझा व लेबनॉनमधील विनाशकारी कार्यामध्ये इस्रायलला साथ दिली आहे. “इस्रायलला लेबनॉनवर कब्जा मिळवायचा आहे, परंतु हिजबुल्ला त्यांच्यासमोर अडथळा ठरतोय,” असे कासिम म्हणाले. त्यांनी असेही स्पष्ट केले की, मागील काही महिन्यांमध्ये संघटनेला कठीण संकटाचा सामना करावा लागला असला तरी संघटना हळूहळू सावरत आहे.
आमच्या भूमीतून बाहेर पडा, अन्यथा तुमचे नुकसान अधिक होईल- नईम कासिम
कासिम यांनी इस्रायलला आव्हान दिले की जर त्यांनी लेबनॉनच्या भूमीतून लवकरात लवकर माघार घेतली नाही तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. “आमच्या भूमीतून बाहेर पडा, अन्यथा तुमचे नुकसान अधिक होईल.” असे त्यांनी ठणकावले. त्यांनी ही धमकी देताना हिजबुल्ला अनेक आठवडे किंवा महिनेही युद्ध करू शकते असे स्पष्ट केले.
नईम कासिम यांची कारकीर्द जास्त काळ टिकणार नाही- इस्त्रालचे संरक्षण मंत्री
दरम्यान, इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गालंट यांनी कासिम यांच्या नियुक्तीबाबत कठोर इशारा देत सांगितले की त्यांची कारकीर्द जास्त काळ टिकणार नाही. “जर त्यांनी आपल्या पूर्वसुरींच्या पावलांवर पाऊल ठेवले तर हिजबुल्लाच्या इतिहासात त्यांची कारकीर्द सर्वात कमी कालावधीची ठरू शकते,” असा इशारा इस्रायलने दिला.
हे देखील वाचा- रशियाला मदत केल्याने अमेरिकेची कडक कारवाई; भारतीय कंपन्यांसह 398 कंपन्यांवर बंदी