फोटो सौजन्य; सोशल मीडिया
वॉशिंग्टन: सध्या रशिया-युक्रेन यांच्या संघर्ष वाढत चालला आहे. एकीकडे उत्तर कोरिया रशियाला मदत करत आहे तर दुसरीकडे अमेरिका युक्रेनला पाठिंबा देत आहे. दरम्यान अमेरिकेन मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाला मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने भारत, रशिया, चीन, हाँगकाँग, यूएई, तुर्की आणि थायलंडसह 13 देशांतील 398 कंपन्यांवर निर्बंध लागू केले आहेत.
रशियाला युद्धसामग्रीत मदत केल्याचा आरोप
रशियाच्या युक्रेनविरुद्धच्या संघर्षात या कंपन्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. याबाबत अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, या कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान, लष्करी उपकरणे आणि इतर सहाय्य पुरवून रशियाला युद्धसामग्रीत मदत केली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
हे देखील वाचा- मोठी दुर्घटना! ब्रिटीश आण्विक पाणबुडीला भीषण आग; दोनजण गंभीररित्या जखमी
रशियाच्या अर्थव्यवस्थेला आणखी फटका बसण्याची शक्यता
तसेच यूएस ट्रेझरी आणि गृह विभागाच्या या कठोर कारवाईचा उद्देश रशियाला मदत करणाऱ्या देशांना आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या आटोक्यात आणणे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर लादलेल्या हजारो निर्बंधांचा हा भाग असून, या नवीन निर्बंधामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला आणखी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वरिष्ठ अधिकारी आणि चिनी कंपन्यांवरही निर्बंध
अमेरिकेच्या या निर्णयानुसार, बंदी घातलेल्या 274 कंपन्यांनी रशियाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरवठा केल्याचे निष्कर्ष आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर रशियाने युक्रेनविरोधी लष्करी कारवाईत केल्याचे आरोप आहेत. रशियन संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकारी आणि चिनी कंपन्यांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. याशिवाय, बेलारूसमधील काही व्यक्तींवर राजनैतिक निर्बंध लावण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
भारतीय कंपन्यांवर निर्बंध
याशिवाय भारतीय कंपन्यांवरही अमेरिकेने कारवाई केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, भारतीय कंपनी फ्युचरवोवर रशियाच्या ओरलान ड्रोनसाठी उच्च प्राधान्याच्या वस्तू पुरवल्याचा आरोप आहे. तसेच, श्रेया लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीवर 2023 पासून शेकडो अमेरिकन ट्रेडमार्क तंत्रज्ञान रशियाला पाठवल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. या ट्रेडमार्क कंपन्यांची किंमत करोडो डॉलरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेच्या या निर्बंधांनी रशियाच्या युद्धसामर्थ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा- कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण मारणार बाजी? सर्वेक्षणातून आले समोर