मुस्लिम राष्ट्रांमध्ये इराण एकटा पडलाय का? इस्लामिक क्रांतीशी काय आहे संबंध? वाचा सविस्तर
अणवस्त्र निर्मितीवरून इस्रायल आणि इराणमध्ये भीषण संघर्ष उफाळला आहे. दोन्ही देश एकमेकांनी संपवण्याची भाषा करत असून आतापर्यंत शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. तर कित्येक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या बाजूने अमेरिका ठामपणे उभी आहे, मात्र इराणच्या समर्थनार्थ सध्यातरी कोणताही देश दिसत नाही. मुस्लिम देशही इराणची बाजू घेताना दिसत नाहीत, त्यामुळे इराण कुठेतरी एकटा पडलाय का? या आधीही इराण अरब देशांपासून अलिप्त होता का? इस्लामिक क्रांतीचा इराणशी काय संबध आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या रिपोर्टमधून…
युद्धाचा नवा टप्पा सुरू! इराणचा इस्रायलवर बॅलिस्टिक हल्ला; बेअरशेबातील मायक्रोसॉफ्ट ऑफिसजवळ स्फोट
1979 साली इराणमध्ये घडलेल्या इस्लामिक क्रांतीने फक्त त्या देशाच्या अंतर्गत राजकारणात नव्हे तर संपूर्ण मुस्लिम जगतात मोठा भूकंप घडवून आणला. अमेरिकेच्या साथीने प्रगतिकडे वाटचाल करणाऱ्या इराणचा प्रवास अचानक कट्टरतेकडे वळला आणि इराणच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडून आले. या बदलांनी इराण स्वतः मुस्लिम राष्ट्रांपासूनच अलिप्त झाला. 2024 साली इराणने इस्रायलवर 300 क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ला केला, ज्यात जॉर्डन आणि काही अरब देशांनी इस्रायलची मदत केली. यावरून मुस्लिम जगतात इराण एकटा पडल्याचं दिसून आलं.
1979 पूर्वी इराण हा अमेरिका समर्थित, प्रगतिशील आणि स्थैर्यप्रिय देश म्हणून ओळखला जात होता. शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्या नेतृत्वाखाली इराण पाश्चिमात्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून अरब देशांमध्ये प्रभावशाली देश बनला होता. त्यावेळी इस्लामीक राष्ट्रांमध्ये इराणचा दरारा होता आणि तो जगताचा एक प्रमुख स्तंभ मानला जात होता.
पण जानेवारी 1979 मध्ये शाह पहलवींची हकालपट्टी झाली आणि अयातुल्ला रुहोल्ला खोमेनेई यांच्या नेतृत्वाखाली एक इस्लामिक क्रांती उभी राहिली. ही क्रांती एकमात्र धार्मिक सत्ताकेंद्र असलेल्या राजवटीकडे झुकली. ‘अल्लाह एक आहे आणि त्याच्या राज्यात कोणत्याही प्रकारची भिन्नता चालणार नाही’ असा खोमेनेई यांचा विचार होता. त्यांनी इस्लामी क्रांतीच्या प्रसाराचं धोरण राबवलं आणि हेच धोरण इराणचे मुस्लीम राष्ट्रांशी संबंध बिघडवण्याचे मुख्य कारण बनलं.
खोमेनेई यांच्या मतानुसार, जगभर पसरलेले मुस्लिम देश एकत्रित व्हावेत आणि त्यांच्या सत्तेवर ‘शुद्ध इस्लामी विचारसरणी’चं वर्चस्व असावं. जोपर्यंत ‘अल्लाह एक आहे’ ही गर्जना संपूर्ण जगात ऐकू येत नाही, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही. यामुळेच त्यांनी शेजारील देशांमध्ये क्रांतीचा प्रचार सुरु केला. पण अरब देश विशेषतः सुन्नी बहुल राष्ट्रे – सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहरेन आणि कतार यांना ही कट्टर शिया विचारधारा डोईजड वाटू लागली.
1978 मध्ये अबादन शहरातील ‘सिनेमा रेक्स’ हॉलमध्ये 422 नागरिकांना जाळून मारण्यात आले. यामागे खोमैनी समर्थकांचा हात होता, पण त्यांनी हा हल्ला शाह आणि त्यांच्या गुप्तहेर संघटनेवर ढकलला. यामुळे जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला आणि खोमैनींना मोठा जनसमर्थन मिळालं. हाच क्रांतीचा निर्णायक टप्पा ठरला.
क्रांतीनंतर इराणचा पहिला शत्रू ठरला तो इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसैन. दोघेही शिया बहुल देश असले तरी सद्दाम सुन्नी होता आणि तो अरब राष्ट्रांची ऐक्यभावना पुढे नेण्यासाठी कट्टर अरब राष्ट्रवादावर भर देत होता. इराण-इराक युद्धात (1980–1988) खोमेनेईनी सद्दामला ‘इस्लामविरोधी’ ठरवत इस्लामी रक्षणाचे युद्ध असल्याचे सांगितले. इराणचा कट्टरवाद आणि क्रांतीचा प्रचारच या संघर्षाची पार्श्वभूमी होती.
खोमेनेई क्रांतीचा प्रचार करत असताना सौदी अरेबिया आणि अन्य सुन्नी बहुल देशांनी ही लाट त्यांच्या देशात पोहोचू नये यासाठी प्रयत्न सुरु केले. लेबनॉनमध्ये मात्र इराणला थोडेसे यश मिळाले, कारण तिथल्या हिजबुल्ला संघटनेने इस्रायलविरोधी भावना आणि शिया अस्मितेमुळे इराणची साथ दिली. पण उर्वरित अरब देशांनी इराणला एकटं पाडण्याचा निर्णय घेतला.
1989 मध्ये खोमैनी यांच्या निधनानंतर अयातुल्ला अली खामेनेई यांनी ‘क्रांतीचा प्रचार म्हणजे जबरदस्ती क्रांती लादणे नव्हे’ असे जरी म्हटले, तरी सुरुवातीला सौदी आणि इराकविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका जगासमोर इराणची प्रतिमा कठीण बनवत गेली. त्यामुळेच मध्यपूर्वेतून इराण अधिकाधिक अलगद होत गेला.
2024 मध्ये इस्रायलवर झालेल्या इराणच्या मिसाईल हल्ल्यानंतर जॉर्डनसह अनेक अरब देशांनी इस्रायलला मदत केल्याचे बोलले गेले. या प्रकारामुळे एक नवीन राजकीय समीकरण उभे राहत आहे – म्हणजे इराणविरोधी अरब-इस्रायली आघाडी. इराणचा कट्टरवाद, क्रांतीचा प्रचार, आणि शिया वर्चस्वाचा आग्रह हे इराणला आज मुस्लिम जगतात एकटे पाडत आहेत.
1979 ची इस्लामिक क्रांती ही इराणच्या इतिहासातील एक महत्त्वाचा वळणबिंदू होती. पण क्रांतीच्या नावाखाली इराणने ज्या प्रकारे शेजारच्या मुस्लिम राष्ट्रांवर आपली विचारसरणी लादायचा प्रयत्न केला, त्यामुळे तो मुस्लिम जगतातून विलग झाला. इस्लामच्या नावाखाली एकरूपता आणण्याचा प्रयत्न प्रत्यक्षात फूट आणि संघर्षाचं कारण बनला. आजही इराणचा कट्टरवाद, इस्रायलविरोधी भूमिका आणि अण्वस्त्र धोरणामुळे मुस्लिम राष्ट्रांचंही शत्रूत्व पत्करल्यांचं तज्ज्ञांचं मत आहे.