Shubhanshu Shukla : भारताचा स्वप्नवत अंतराळ प्रवास आणखी एक ऐतिहासिक पायरी चढणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेची राष्ट्रीय वैमानिकी व अंतराळ प्रशासन संस्था (नासा) यांच्या संयुक्त X-4 मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) झेपावणार आहेत. विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान त्यांच्या हातात ओमेगा कंपनीचे ‘स्पीडमास्टर’ हे खास घड्याळ असेल जे केवळ सौंदर्यशास्त्राचे नव्हे तर वैज्ञानिक अचूकतेचेही प्रतीक मानले जाते.
अंतराळासाठी बनलेले विशेष घड्याळ
ओमेगाचे घड्याळ अंतराळवीरांसाठी नव्हे तर मानवजातीसाठीही एक महत्त्वाचा इतिहास आहे. 1960 च्या दशकात जेव्हा नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन यांनी अपोलो मोहिमेदरम्यान चंद्रावर पाऊल ठेवले, तेव्हा त्यांच्या हातातही ओमेगाचे हेच घड्याळ होते स्पीडमास्टर प्रोफेशनल मूनवॉच. हे घड्याळ मॅन्युअल वाइंडिंग प्रणालीवर चालते आणि एक्स्ट्रा-व्हेहिक्युलर अॅक्टिव्हिटीज (EVA) साठी नासाने प्रमाणित केलेले आहे.
यासोबत, X-4 मोहिमेमध्ये जे दुसरे घड्याळ वापरण्यात येणार आहे ते म्हणजे ओमेगा एक्स-३३ स्कायवॉकर. हे एक डिजिटल आणि ॲनालॉग हायब्रिड घड्याळ असून, खास अंतराळवीरांसाठीच विकसित करण्यात आले आहे. अचूक वेळ मोजण्याबरोबरच, मिशन टाइमिंग, अंतराळातील हालचालींचे मोजमाप आणि विविध तांत्रिक गरजांसाठी हे उपयुक्त ठरते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकाचा ‘Golden Dome’ कसा ठरू शकतो जागतिक सुरक्षेला नवे आव्हान? वाचा एका क्लीकवर…
काय आहे या घड्याळांची खासियत?
या घड्याळांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्य घड्याळांपेक्षा हजारपट अधिक सक्षम आणि काटेकोर आहे. हे घड्याळ -१६० अंश सेल्सिअसपासून ते +२०० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करू शकते. इतकेच नव्हे, तर ४०G पर्यंतच्या जोरदार धक्क्यांनाही तोंड देऊ शकते. गंजरोधक, व्हॅक्यूम-प्रूफ आणि अल्प गुरुत्वाकर्षणातही अचूकपणे कार्यरत राहणारी ही उपकरणे अंतराळ मोहिमेसाठी अनिवार्य बनली आहेत. ओमेगाने आपल्या या घड्याळाचे वर्णन करताना म्हटले आहे की, “हे केवळ एक घड्याळ नाही, तर वेळेच्या अचूकतेचा, मानवी जिद्दीचा आणि वैज्ञानिक परंपरेचा वारसा आहे.”
X-4 मोहिमेचे वैशिष्ट्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य
अॅक्सिओम स्पेस या खाजगी अंतराळ संस्था द्वारे संचालित होणारी X-4 मोहीम ही भारत, पोलंड आणि हंगेरीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे, कारण याआधी गेल्या चार दशकांत या देशांनी एकही सरकारी अंतराळवीर अंतराळात पाठवलेला नव्हता. त्यामुळे ही मोहीम राष्ट्रीय अभिमान आणि वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक मानली जात आहे. या मोहिमेदरम्यान 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले जाणार असून त्यात पृथ्वी विज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवऔषध, पर्यावरणीय अभ्यास यांचा समावेश असेल. यासोबतच, ही मोहीम आंतरराष्ट्रीय तांत्रिक सहकार्याचे प्रतीक म्हणूनही महत्त्वाची ठरणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानपेक्षा वाईट हाल होणार बांगलादेशचे? लष्करप्रमुखांच्या हातात देशाची सूत्र, युनूस हतबल
भारताचा मान वाढवणारी झेप
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची ही झेप केवळ इस्रोसाठीच नव्हे, तर भारताच्या अंतराळ विज्ञानात नवे पर्व सुरू करणारी घटना ठरणार आहे. अचूक वेळेचे भान ठेवणारे आणि कठीण परिस्थितीतही कार्यरत राहणारे ओमेगाचे हे घड्याळ भारताच्या या यशाचा एक अविभाज्य भाग ठरणार आहे. शास्त्रीय दृष्टिकोन, आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि अभिमानास्पद सहभाग या तिन्ही बाबी एकत्रित करत, भारत आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहिमांमध्ये आता निर्णायक भूमिका बजावू लागला आहे, हे निश्चित!