International News
फ्लोरिडाचे स्थानिक नेते चँडलर लँगेविन यांनी अलीकडेच भारतीयांना अमेरिकेतून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्टदेखील केली होती. त्या पोस्टवरून त्यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर, शनिवारी सिटी कौन्सिलने त्यांना त्यांच्या आक्षेपार्ह वक्त्यांवरून फटकारत त्यांचे अनेक अधिकृत अधिकार काढून घेतले.
वॉशिंग्टन पोस्टमधील एका वृत्तानुसार, नगर परिषदेच्या निर्णयानुसार आता लँगेविन यांना कोणताही मुद्दा अजेंड्यावर समाविष्ट करण्यापूर्वी एकमत निर्माण करावे लागेल. निषेध प्रस्तावात लँगेविन यांना आयुक्तांवर भाष्य करण्यासही मनाई करण्यात आली आहे, तसेच, समित्यांमधूनही त्यांना काढून टाकले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
फ्लोरिडाचे चँडलर लँगेविन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या भडकाऊ पोस्टमध्ये अमेरिकेत राहणाऱ्या सर्व भारतीयांना हद्दपार करण्याचे आवाहन केले आहे. लँगेविन यांनी लिहिले, “अमेरिकेची काळजी करणारा एकही भारतीय नाही. ते येथे आपल्याला आर्थिकदृष्ट्या लुटण्यासाठी आणि भारत तसेच भारतीयांना समृद्ध करण्यासाठी आले आहेत. अमेरिका फक्त अमेरिकन लोकांसाठी आहे.” तसेच, “भारतीय फक्त आपले खिसे भरून श्रीमंत बनण्यासाठी किंवा अमेरिकेचा गैरफायदा घेण्यासाठी येथे येतात आणि नंतर भारतात परत जातात.”अशी टीकाही त्यांनी केली होती.
२ ऑक्टोबर रोजी त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून सर्व भारतीयांचे व्हिसा रद्द करण्याची आणि त्यांना तात्काळ हद्दपार करण्याची मागणी केली होती. पण नंतर त्यांनी त्यांच्या टिप्पण्या भारतीय-अमेरिकन समुदायाविरुद्ध नव्हे तर तात्पुरत्या व्हिसा धारकांविरुद्ध होते.असंही त्यांनी सांगितले.
Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल
त्यांच्या वादग्रस्त विधानांवर तीव्र टीका होत असतानाही, फ्लोरिडाचे चँडलर लँगेविन आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी हा वाद “अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा आघात” असल्याचे सांगत माघार घेण्यास नकार दिला आहे. १८ ऑक्टोबर रोजीच्या नवीन पोस्टमध्ये लँगेविन यांनी दावा केला की, “अमेरिकेत मोठ्या प्रमाणात स्थलांतर थांबवण्याबाबत अनेक हिंदू आणि भारतीय-अमेरिकन रूढीवादी गट माझ्याशी सहमत आहेत. अमेरिकेतील अनेक भारतीय-अमेरिकन संघटनांनी लँगेविन यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सिटी कौन्सिलने देखील या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. मात्र, लँगेविन यांनी त्यास प्रत्युत्तर देताना ही कारवाई त्यांच्या संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.