India’s triple challenge after Operation Sindoor Russia’s betrayal China backs Pakistan
Russia’s stance on Operation Sindoor : भारताने अलीकडेच यशस्वीरित्या राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नवे समीकरण उभे राहत आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक विजय मिळवला असला तरी या संपूर्ण संघर्षात रशियाची निष्क्रिय भूमिका आणि चीनचा पाकिस्तानला मिळालेला अप्रत्यक्ष पाठिंबा अनेक गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.
भू-राजकीय विश्लेषकांच्या मते, भारताला आता एका नव्या वास्तवाचा सामना करावा लागतोय—जिथे त्याचा पारंपरिक मित्र असलेला रशिया मौन बाळगतोय आणि चीन उघडपणे पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहत आहे. चीनने गेल्या दशकात पाकिस्तानला तब्बल ८.२ अब्ज डॉलर्सचे शस्त्रास्त्र विकले आहेत. युरेशियन टाईम्सच्या अहवालानुसार, २०२० ते २०२४ या कालावधीत चीनच्या एकूण शस्त्रास्त्र निर्यातीपैकी ६३% शस्त्रास्त्रे पाकिस्ताननेच खरेदी केली. यात टँक, लढाऊ विमाने, हवाई संरक्षण प्रणाली आणि दारूगोळा यांचा समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीनने पाकिस्तानला PL-15 सारखी क्षेपणास्त्रे पुरवली, इलेक्ट्रॉनिक युद्धात सहकार्य केले आणि सोशल मीडियावर भारतविरोधी प्रचंड प्रचार चालवला. हे सर्व घडत असताना रशिया मात्र शांत होता. पुतिन प्रशासनाने एकही स्पष्ट भूमिका घेतली नाही. यामुळे रशिया–भारत संबंधांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. विशेष म्हणजे, १९७१ च्या युद्धात रशिया भारताच्या बाजूने उभा राहिला होता. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. युक्रेन युद्धामुळे रशिया आर्थिकदृष्ट्या चीनवर अधिक अवलंबून झाला आहे आणि त्यामुळेच तो भारताच्या बाजूने उघडपणे बोलू शकत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मॉस्को विमानतळावर युक्रेनी ड्रोन हल्ला; भारतीय खासदारांचे विमान हवेतच अडकले
चीनने पाकिस्तानला लवकरच पाचव्या पिढीतील J-35A लढाऊ विमान देण्याची तयारीही दर्शवली आहे. भारतासाठी हे अतिशय गंभीर धोरणात्मक आव्हान आहे, कारण भविष्यात चीन पाकिस्तानसोबत फक्त अप्रत्यक्ष नव्हे, तर थेट युद्धात सहभागी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भू-राजकीय विश्लेषक प्रकाश नंदा यांनी म्हटले आहे की, भारताने यापुढे ‘दोन आघाड्यांवर युद्ध’ ही केवळ संकल्पना म्हणून नव्हे, तर प्रत्यक्ष धोका म्हणून पाहायला हवे. १९६२ पासून १९७१ पर्यंत आणि आताचे युद्ध पाहता चीन सतत पाकिस्तानच्या बाजूने उभा राहत आला आहे – सुरुवातीला अप्रत्यक्ष, पण आता ते उघड होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जर हार्वर्डमधील राहायचे असेल तर! भारतीयांसह परदेशी विद्यार्थ्यांना 72 तासांच्या आत पूर्ण कराव्या लागणार ‘या’ 6 अटी
अशा परिस्थितीत, भारताने आता सामरिक तयारीत प्रचंड बदल घडवून आणायला हवा. रशिया किंवा अमेरिकेकडून कुठलीही थेट मदत मिळेल अशी अपेक्षा न करता, देशाने सायबर युद्ध, हवाबंद संरक्षण, स्वदेशी उत्पादन, आणि जागतिक राजनैतिक नातेसंबंध अशा अनेक पातळ्यांवर स्वतःची ताकद उभी करावी लागेल.