Iran readies missiles for swift strike on Israel-US
Middle‑East Defense : पश्चिम आशियात आणखी एका युद्धाचे सावट घोंगावत आहे. इराणच्या अणुस्थळांवर इस्रायल आणि अमेरिकेकडून संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेता, इराणने तात्काळ प्रत्युत्तर देण्याची व्यापक योजना आखली आहे. शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज इराणी लष्कर पूर्णपणे सज्ज असल्याचे वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
न्यू यॉर्क टाईम्सच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत इराणमध्ये उच्चस्तरीय लष्करी बैठका सुरू आहेत. या बैठकींमध्ये इराणच्या संरक्षण मंत्री, लष्करी कमांडर आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी भाग घेतला. यामध्ये इस्रायलकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या परिणामांवर चर्चा झाली असून, इराणने हल्ल्यानंतरच्या प्रतिक्रियेचे तपशीलवार नियोजन पूर्ण केले आहे.
इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलकडून कोणतीही लष्करी कारवाई झाली, तर इराणकडून तत्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल. हे प्रत्युत्तर केवळ सीमित नसेल, तर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करून विविध लक्ष्यांवर हल्ले करण्यात येतील, असे सांगण्यात आले. या अधिकाऱ्याच्या मते, “इराणला या प्रदेशात शांतता हवी आहे, परंतु जर कोणतीही आक्रमकता आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती कदापिही सहन करणार नाही.” हे वक्तव्य दर्शवते की कोणतीही लष्करी चूक संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडवू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘समुद्राच्या आत अणुबॉम्ब फोडावे लागणार…’ अमेरिकन संशोधकाचा वादग्रस्त प्रस्ताव चर्चेत
इराणच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनेही सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम आशियातील विविध भागांतून अमेरिकेने आपल्या राजनैतिक कर्मचाऱ्यांना मागे बोलावले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक नेत्यांनी इशारा दिला आहे की, हे संपूर्ण क्षेत्र भविष्यात अत्यंत अस्थिर आणि धोकादायक ठरू शकते. यूके मेरीटाईम एजन्सीनेही मध्यपूर्वेत लष्करी हालचाली वाढल्याचा अलर्ट जारी केला आहे. विशेषतः इराणच्या सागरी सीमांवर तणाव अधिक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार, इस्रायलकडून इराणवर कोणताही हल्ला झाल्यास अमेरिका त्या युद्धातून अलिप्त राहू शकणार नाही. कारण इराणने आधीच जाहीर केले आहे की, इस्रायलकडून होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार असेल. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने पश्चिम आशिया, पूर्व युरोप आणि उत्तर आफ्रिकेतील आपल्या दूतावासांना आपत्कालीन बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, इराणशी संबंधित संभाव्य धोक्यांबाबत तात्काळ सुरक्षा उपाययोजना करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
इराणच्या अणु कार्यक्रमावर इस्रायलचा संशय अनेक वर्षांपासून कायम आहे. इराणच्या भूमिकेवर विश्वास नसल्यामुळे, इस्रायल अनेक वेळा या ठिकाणांवर हल्ल्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत. परंतु या वेळी परिस्थिती अधिक गंभीर आहे. कारण इराणही आता फक्त ‘संयम’ न ठेवता थेट लष्करी प्रत्युत्तराची भाषा वापरत आहे. जर युद्ध सुरु झाले, तर केवळ इराण-इस्रायलच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम आशिया युद्धाच्या खाईत लोटले जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Project Pelican’मुळे खळबळ; भारताविरुद्ध खलिस्तानी समर्थक, ISI आणि ड्रग्ज नेटवर्कचा भयंकर कट उघड
इराण आणि इस्रायलमधील तणावाचा पातळीवर गेलेला हा टप्पा आंतरराष्ट्रीय शांततेसाठी धोक्याची घंटा आहे. अमेरिका, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांनी या परिस्थितीवर तात्काळ लक्ष देणे अत्यावश्यक आहे. कारण जर युद्धाची ठिणगी पेटली, तर जगभरात तेलाचे दर, स्थलांतराचे प्रश्न, आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा ताण तणावाने भडकू शकतात. त्यामुळे इराणने दिलेल्या या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घेणे ही जागतिक समुदायाची जबाबदारी आहे.